तुळजापूर / प्रतिनिधी-

शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक आणि पत्रकार रविंद्र केसकर (उस्मानाबाद) यांचे " वाचाल तर दिसेल " या विषयावर हे व्याख्यान होणार आहे.

तुळजापूर शहरातील नळदुर्ग रोडवरील तुळजाभवानी सैनिक विद्यालय येथे हा उपक्रम घेण्यात येणार आहे. सोमवार, दि. १६ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता हे व्याख्यान आयोजित केले आहे.

सध्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये सोशल मिडियाचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. विविध सोशल साइट्स, मोबाईल गेम्स यात मुले गुंतलेली आढळून येत आहेत. यामुळे मुले परिपूर्ण ज्ञान देणाऱ्या पुस्तकांपासून दुरावली आहेत. वाचन माणसाला समृद्ध करते. विचारशील पिढीच्या निर्माणासाठी वाचन संस्कृती महत्वाची आहे.   त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड, गोडी निर्माण होण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या व्याख्यानास शालेय विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मराठवाडा साहित्य परिषदेचे  अध्यक्ष अमर हंगरगेकर आणि कार्यवाह विजय देशमुख यांनी केले आहे.


 
Top