उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  दि. 06 जानेवारी रोजी किल्ले वाफगाव येथे महाराजा यशवंतराव होळकर(प्रथम) यांचा राज्याभिषेक दिन सोहळा गजी नृत्य, मर्दानी खेळ, शस्त्र अस्त्र प्रदर्शन, ढोल वादन व भंडार्याच्या उधळणीने मोठ्या उत्साहात पार पडला. या वर्षी कर्तृत्ववान स्त्रियांना राज्याभिषेकाची संधी देण्यात आली होती, खेड च्या तेहसीलदार वैशाली वाघमारे IAS स्नेहल धायगुडे, उज्वलाताई हाक्के, पूजाताई मोरे, ललिताताई पुजारी, संगीताताई पाटील यांनी महाराजांच्या मूर्तीवर राज्याभिषेक केला. या कार्यक्रमासाठी यशवंतराव महाराजांवर व होळकर घराण्यावर प्रेम करणारे समाज बांधव व भगिनी, अनेक ऐतिहासिक घराण्यांचे वंशज, सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत मान्यवर, प्रशासकीय अधिकारी, अठरा पगड जातीतील विविध संघटना, इतिहास प्रेमी मोठ्या संख्येने राज्य व देशभरातून उपस्थित होते.

राजराजेश्वर चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांचे भारतीय इतिहासातील योगदान अद्वितीय आहे. जगभरात अजिंक्यक मानल्या जाणाऱ्या इंग्रजांचा त्यांनी अनेक वेळा पराभव केला. भारतीय स्वातंत्र्य लढ्याची बीजं लढवय्या मनात पेरली.  राजस्थान, माळवा, पंजाब, दिल्ली इतक्या भल्या मोठ्या प्रदेशात महाराजांनी इंग्रजांविरुद्ध युद्धे लढली. भारतमातेच्या रक्षणासाठी आपसातील मतभेद विसरुन देशभरातील सर्व राजा महाराजांना एकत्र येण्याचे आवाहन केले. इंग्रज यशवंतराव महाराजांना भारताचा नेपोलिअन म्हणत. महाराजांशी बिनशर्त संधी करण्याची इंग्रजांची मानसिकता होती. मात्र महाराजा यशवंतराव होळकर यांना  स्वतंत्र हिंदुस्थान हवा होता. हा इतिहास तरुणांना प्रेरणादायी आहे.

या पराक्रमी देशभक्त राजाचे जन्मस्थान असलेला वाफगावचा भुईकोट किल्ला सुभेदार मल्हारराव होळकर यांनी बांधून घेतला होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या वास्तव्याने ही वास्तु पावन झाली आहे. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार वाफगावचा किल्ला आज हि दुर्लक्षित- उपेक्षित आहे. त्याचे जतन संवर्धन व्हावे या साठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे त्यामुळे परिसराचा विकास होईल, ग्रामस्थांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, पर्यटन वाढेल.

अशी भावना होळकर राजघराण्याचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांनी व्यक्त केली. त्यांच्याच  नेतृत्त्वात 'होळकर राजपरिवारा' तर्फे राजराजेश्वर चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले जाते.

 
Top