उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना न्याय देण्यासाठी भारतीय संविधान, ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हे ग्रंथ लिहिले. ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ लिहिण्यापूर्वी त्यांनी बुद्ध धम्माशी निगडीत सहा हजार पुस्तके वाचली होती. त्यामुळे त्यामध्ये तळटीपा लिहिलेल्या नाहीत. संविधानात सर्व घटकांना न्याय देण्यासाठी तरतुद आहे. विशेष म्हणजे घटनेच्या सरनाम्यात ‘स्वातंत्र्य’ शब्दाऐवजी ‘प्रथम न्याय’ हा शब्द वापरला. कारण न्याय मिळाला तरच स्वातंत्र्य, समता व बंधुता आपोआप येते. त्यामुळे परिवर्तनाची चळवळ यशस्वी करण्यासाठी संविधान व ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हे ग्रंथ सर्वांच्याच उपयोगाचे असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे यांनी केले.

उस्मानाबाद येथील गोरे कॉम्प्लेक्समधील माता रमाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शनिवार, 14 जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्यावतीने आयोजित व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते नामविस्तार लढ्यातील योध्द्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सावंत उपस्थित होते. पुढे बोलताना प्राचार्य डॉ. कांबळे म्हणाले की, दादासाहेब गायकवाड यांनी भूमिहिनांचा मोठा लढा तयार केला होता. त्यानंतर नामांतराचा लढा उभा राहिला. नामांतरानंतर दलित पँथर बरखास्त झाल्यानंतर अनेकजण रडले, रिपाइंचे ऐक्य झाले. मात्र दुर्दैवाने एकही नेता ऐक्याच्या मानसिकतेत नव्हता. नामांतराची चळवळ समग्र समतेची न्याय देणारी आंबेडकरी चळवळ आहे. या चळवळीमुळे मुले वाचायला व भाषण करायला शिकल्याने अनेक फायदे झाले. तर डॉ. आंबेडकरांनी परिवर्तनाचा संविधान ग्रंथ दिला असून तो क्रांतीला सूचक असा आहे. संविधानाची चौकट कोणालाही बदलता येत नाही. मात्र अंतर्गत बदलासाठी ती अतिशय लवचिक आहे. त्यामुळे मतदानाचा हक्क 21 वरुन तो 18 वर्षांचा करण्यात आला. तर जम्मू-कश्मीरमध्ये राजा हरिश्चंद्र हिंदू तर प्रजा मुस्लिम होती. तसेच मराठवाड्यात औरंगजेब राजा मुस्लिम तर प्रजा हिंदू होती. तेथील विसंगतीमुळे 370 कलम रद्द करण्यात आल्याचेही प्राचार्य कांबळे यांनी व्यक्त केेले.

क्रांती, परिवर्तन व बदलाव याला पूरक व सर्वसामान्याला समोर ठेवून संविधान निर्मिती केलेली असून न्याय, सामाजिक समता, आर्थिक व राजनैतिक या चार खांबावर भारतीय लोकशाही उभी आहे. संविधान हे या देशात राहणार्‍या प्रत्येकासाठी ही राज्यघटना अतिशय उपयोगाची आहे. लोकांना न्याय मिळाला नाही, तर ते स्वातंत्र्य पारतंत्र्यात जाते व अन्याय खूप वाढला तर लोक स्वातंत्र्यासाठी लढा देणार नाहीत. त्यामुळे भारतीय जनतेने मालक बदलला असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते नामांतर चळवळीतील लढा दिलेल्या दादासाहेब जेटीथोर, डॉ. बशारत अहेमद, अरुण बनसोडे, बाबासाहेब बनसोडे, रविंद्र शिंदे, सुदेश माळाळे, प्रा. शांतीनाथ शेरखाने, धनंजय वाघमारे, जयराज खुने, व्ही. एस. गायकवाड, बाळासाहेब माने, बाबासाहेब जानराव, गुणवंत सोनवणे, प्रभाकर बनसोडे, अच्युत सरवदे, डॉ. रमेश कांबळे व सुनील बनसोडे आदी योद्ध्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. प्रस्ताविक प्रा. महेंद्र चंदनशिवे यांनी तर सूत्रसंचालन मारुती पवार यांनी व उपस्थितांचे आभार निमंत्रक प्रा. रवी सुरवसे यांनी मानले. यावेळी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top