उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्ह्यातील गायरान जमिनीवर अतिक्रमण करून वहिवातीस आणलेल्या शासकीय पडगायरान जमिनीचे तलाठी व गिरधावर यांच्यामार्फत पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी श्रमिक मानवाधिकार संघाच्यावतीने एका निवेदनाद्वारे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्याकडे दि.२६ जानेवारी रोजी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र महसूल संहिता १९८९ मधील महाराष्ट्र जमीन (मंडळ अधिकारी व मंडळ निरीक्षक) कर्तव्य व कामे १९७० मधील नियम १६, १७ प्रमाणे १९८९ पूर्वीपासून गायरान जमिनीवर अतिक्रमण करून वहीतीस आणलेल्या जिल्ह्यातील शासकीय पडगायरान जमिनीचे पंचनामे करण्यात यावेत. शासकीय पडगायरान व गावठाण जमिनीवर निवासी अतिक्रमण करून राहत असलेल्या कुटुंबांच्या नावे प्लॉट करण्यात यावेत, त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश द्यावेत. तसेच पूर्वीच्या महसूल विभागाची व आताची वन विभागाची गायरान जमिनीवर १९८९ पूर्वीपासून अतिक्रमण करून वहितीखाली आणलेल्या जमिनीचे २८ नोव्हेंबर १९९१ च्या जीआरमधील परिच्छेद १० प्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी गायरान नावावर करण्यासाठी प्रस्ताव दाखल केलेले आहेत. त्यामुळे त्या प्रस्तावाची छाननी करून गायरान जमिनी नावे करण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे. यावर संस्थापक अध्यक्ष भाई बजरंग ताटे, जिल्हाध्यक्ष माया शिंदे, सोमनाथ पवार व वसंत मेंडके आदींच्या सह्या आहेत.


 
Top