उमरगा/ प्रतिनिधी-
लोहारा तालुक्यातील होळी येथील शेतकऱ्यांनी मंगळवारी (दि. १०) लोकमंगल कारखान्याविरोधात आंदोलन सुरू केले आहे. शेतकरी हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन होळी येथील पाण्याच्या टाकीवर चढले आहेत. जवळपास २० ते २५ शेतकरी आंदोलन करत असल्याची माहिती मिळत आहे.
लोहारा तालुक्यातील होळी येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी लोकमंगल कारखान्यास ऊस दिला होता. लोकमंगल कारखान्याने ऊस दर दोन हजार प्रमाणे दिला होता. त्यामुळे उर्वरीत ५०० रुपये ऊस दर द्यावा या मागणीसाठी होळी येथील शेतकऱ्यांनी अनेकवेळा कारखाना प्रशासनास निवेदन दिले होते. तसेच यापूर्वी कारखाना स्थळी आंदोलन केले होते. या आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांनी निवेदन दिले होते. त्यात उर्वरित ५०० रुपये देण्यात यावे अशी मागणी केली होती. ५ जानेवारी पर्यंत कोणताही निर्णय झाला नसल्यामुळे मंगळवारी दि. १० जानेवारी रोजी सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सर्व शेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी आंदोलनास सुरुवात केली आहे. शेतकरी हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन होळी येथील पाण्याच्या टाकीवर चढले आहेत. या आंदोलनात संजय मनाळे, केशव सरवदे, व्यंकट माळी, पांडुरंग जाधव, दत्तू भोसले, अमोल गायकवाड, प्रवीण मोरे, संजय जाधव, प्रियेश जाधव, भुजंग मोरे, शिवाजी पवार, अनिल गायकवाड, माधव पाटील, मारुती जाधव, किसन पाटील, अमोल शिंदे, ज्ञानेश्वर गवळी, दत्तू गिरी, मधुकर बिराजदार, व्यंकट जाधव सहभागी झाले आहेत. या आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने कारखाना प्रशासन आता काय भूमिका घेणार याकडे पाहावे लागेल.