परंडा /प्रतिनिधी -
परंडा तालुक्यातील अनाळा येथील नौशाद अलिम शेख यांना प्रयोगशील शेतकरी म्हणून सन्मानित करण्यात आले . औरंगाबाद येथे सकाळ अँग्रोवन प्रदर्शन - २०२३ दि . १५ रोजी सकाळ अग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण ,मराठवाडा आवृत्तीचे निवासी संपादक दयानंद माने , मराठवाडा रेशीम विभागाचे उपसंचालक दिलीप हाके यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले .
स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेत नौशाद अलिम शेख या परंडा तालुका समन्वयक म्हणून कार्यरत आहेत . त्यांनी शेतकऱ्यांना स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थे अंतर्गत युरोपियन युनियन प्रकल्प अंतर्गत सेंद्रिय शेती , शेळीपालन , पशुखाद्य निर्मिती , चाटण वीट , नीम आईल , मसाला बोलस , गांडुळ बेड उभारणी याविषयी माहिती देऊन त्याची प्रत्यक्ष चाचणी शेतकर्यांना प्रात्यक्षिक करून दिली आहे . त्यांच्या या माहिती चा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे . शेळीपालन करताना शेळ्यांची निगा कशी राखावी यामध्ये शेळ्यांचा गोठा , चारा स्टॅन्ड , पाणी स्टॅन्ड , डिव्हर्मींग आणि लसीकरण , शेळ्यांसाठी चारा आदी महत्वपूर्ण बाबी शेळीपालकांना दिल्याने शेळी पालन व्यवसायात मोठी वाढ होत असून शेळी पालकाची आर्थिक बाजू भक्कम होत आहे . गांडुळ बेड उभारणी करून त्यामध्ये गांडुळ खत निर्मिती केल्याने त्या खताचा शेतीसाठी मोठा फायदा होत असल्याने शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनात वाढ होत आहे . स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या वतीने नौशाद शेख यांनी परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांना [बायोगॅस ] गोबर गॅस चे महत्व पटवून सांगितल्यामुळे तालुक्यात जवळपास २०० बायोगॅस शेतकऱ्यांना जोडणी केली आहे . त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रयोगशील शेतकरी म्हणून सन्मानित करण्यात आले.त्यांच्या या सन्मानामुळे स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेचे संचालक उपमन्यू पाटील , प्रकल्प व्यवस्थापक किरण माने , प्रकल्प समन्वयक योगेश देशमुख , सीमा सय्यद यांनी अभिनंदन केले आहे .