उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद पंचायत समिती अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचारांचे विविध कारनामे दररोज समोर येत आहेत. असाच प्रकार तावरजखेडा ग्रामपंचायतमध्ये झाला असून या भ्रष्टाचाराच्या मालिकेची चौकशी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य समाधान केशव फेरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आमरण उपोषण दि.३० जानेवारी रोजी सुरु केले. 

हे उपोषण सुरु करताच गट विकास अधिकाऱ्यांनी तांत्रिक मुद्यांची चौकशी करण्यासाठी अडचण येत असल्यामुळे दि.१५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मागितली आहे.  तसे लेखी आश्वासन देत त्या उपोषणकर्त्याची आश्वासनावरच बोळवण केली आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील तावरजखेडा ग्रामपंचायत अंतर्गत २०१५ पासून विविध कामे फक्त कागदावरच केल्याचे दाखविले आहे. मात्र ती विकास कामे न करताच त्यासाठी असलेल्या निधीचा परस्पर हडप केला आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी करुन दोषींवर गुन्हे दाखल करण्यासाठी गेल्या ५ महिन्यांपासून गट विकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे सातत्याने निवेदनाद्वारे पाठपुरावा करीत आहेत. मात्र अद्यापपर्यंत केवळ चौकशी करण्यात येईल, असे आश्वासनच दिले जात आहे. मात्र चौकशी होत नसल्यामुळे दि.२ जानेवारी रोजी आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता. इशारा दिल्यानंतर देखील चौकशी न केल्यामुळे हेरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी आमरण उपोषण सुरू केले. मात्र पंचायत समिती भ्रष्टाचारात सतत चर्चेत असल्यामुळे अगोदरच बदनाम झालेल्या व होत असलेल्या प्रकारामुळे गट विकास अधिकारी यांनी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास संबंधित अधिकाऱ्यांना पाठवून त्या उपोषणकर्त्याची समजूत काढली आहे. तर तांत्रिक मुद्द्यांची चौकशी करण्यास दि.१५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मागवून घेतली आहे.

 
Top