उस्मानाबाद / प्रतिनिधी -

प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सोलापूर-तुळजापूर- उस्मानाबाद रेल्वे मार्गाबाबत जिल्ह्यातील जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून गतीने प्रयत्न चालू असून ८४.४४ किमी लांबीच्या मार्गासाठी राज्य शासनाने आपल्या वाट्याचे ४५२ कोटी ४६ लाख रुपये आर्थिक सहभाग देण्याचा निर्णय घेतल्याने व केंद्राकडून देखील निधी मिळणार असल्याने निधीची अडचण भासणार नाही त्यामुळे राज्य शासनाने हा प्रकल्प फास्ट ट्रॅकवर घेत आपल्या ‘महारेल’ च्या माध्यमातुन दोन वर्षात पूर्णत्वास नेण्याचे नियोजित असल्याची माहिती आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांची गतीने अंमलबजावणी करण्यासाठी, ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने २०१७ साली महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ‘महारेल’ ची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. या ‘महारेल’ च्या माध्यमातून राज्यात अनेक रेल्वे प्रकल्पाचे काम दर्जेदार व गतिमान पद्धतीने पूर्ण केले आहे.

सोलापूर-तुळजापूर- उस्मानाबाद रेल्वे मार्गाबाबत उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस साहेबांचे विशेष लक्ष असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प २ वर्षात पूर्ण करण्याचे ध्येय निश्चित केले असून त्यासाठी राज्य सरकारने सदर रेल्वे मार्ग ‘महारेल’ या स्पेशल पर्पज व्हेईकल (SPV) च्या मार्फत राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने ‘महारेल’ कडे प्रकल्पाचे हस्तांतरण करण्यासाठी प्रधान सचिव परिवहन यांच्या स्तरावरून रेल्वे बोर्डाची प्रशासकीय मान्यता घेण्यासाठीची प्रक्रीया सुरू असल्याचे आ.पाटील यांनी सांगितले आहे.

रेल्वेचे अधिकाऱ्यांनी सोलापूर-तुळजापूर- उस्मानाबाद रेल्वे मार्ग पूर्ण करण्यासाठी  अंदाजे ४ वर्षाचा कार्यकाल अपेक्षित असल्याचे सांगितले होते.मात्र राज्य सरकारने सदर प्रकल्प फास्ट ट्रॅक वर घेत ‘महारेल’ च्या माध्यमातून २ वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून याबाबतच्या प्रशासकीय मान्यता लवकरच मिळेल व  हा प्रकल्प २०२५ पर्यंत पुर्ण होईल अशी अपेक्षा आ.पाटील यांनी व्यक्त केली आहे.

तत्कालीन ठाकरे सरकारने जर यापूर्वीच राज्याचा वाटा उचलण्यासाठी पावले उचलली असती व निर्णय घेतला असता तर कदाचित हा प्रकल्प आतापर्यंत पूर्ण झाला असता.मात्र आता राज्यात शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गतिमान सरकार आल्याने याबाबत सर्व अनुषंगिक बाबींची पूर्तता तातडीने होत असून जिल्ह्यातील जनतेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींजींनी तुळजापूरला रेल्वेच्या नकाशावर आणण्याचा दिलेला शब्द २०२५ पर्यंत पूर्णत्वाला जाईल याबाबत खात्री असल्याचे आ.पाटील यांनी म्हटले आहे.

 
Top