कळंब (शिवप्रसाद बियाणी ) 

कळंब तालुक्यातील पानगाव येथील अतिक्रमनातुन झालेल्या वादाला वेगळे वळण आले असून पानगाव येथील ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी येरमाळा परिसरातील सुमारे तीनशे ते चारशे जणांच्या जमावाने  प्रेतासह बुधवारी सायंकाळी पोलीस स्टेशनच्या आवारात जमाव केला. पानगाव मध्ये झालेल्या अतिक्रमणाच्या वादाप्रकरणी गावकऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी जमावाने केली होती. मात्र पोलिसांनी तब्बल दोन अडीच तास समजून सांगितल्यानंतर जमावातील बहुतांश जण मृतदेह घेऊन निघून गेले. त्यातीलच कहि जण रात्री उशिरापर्यंत ठाण्याच्या जवळच बसून होते. पानगाव येथे झालेल्या अतिक्रमणाच्या वादामुळे सोमवारी रात्री दोन गटात वाद निर्माण झाला होता. यामध्ये ग्रामस्थ व एका विशिष्ट  समाजामध्ये हाणामारी होऊन 11 जण जखमी झाले होते. यातील ग्रामस्थांच्या गटावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सायंकाळी सातच्या सुमारास तब्बल तीनशे ते चारशे जणांचा जमाव येरमाळा पोलीस स्टेशन कडे आला. यावेळी जमावाने त्यांच्यातील एका मृत व्यक्तीचा मृतदेह पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आणून ठेवला. पानगावच्या झालेल्या दोन गटाच्या वादामध्ये यांचा मृत्यू झाल्याचा दावा करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जमावाकडून करण्यात येत होती. 

 येरमाळा बंद 

पानगाव येथील सरपंच व नागरिकांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ गुरुवारी येरमाळा येथे व्यापारी व ग्रामस्थांच्या वतीने येरमाळा बंदची हाक दिली. यावेळी सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन हा निर्णय घेतला. यावेळी विविध पक्षातील नेत्यांनी या येरमाळा बंदला पाठिंबा दिला.

 वनविभागाने हटवले अतिक्रमण 

कळंब तालुक्यातील पानगाव शिवारातील असणाऱ्या वन विभागाच्या 26 एकरवर पारधी समाजाने केलेले अतिक्रमण वनविभागाकडून हटवण्यात आले.


 
Top