प्रतिनिधी/उस्मानाबाद
विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज बाद न करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना भूमचा उपलेखापरिक्षक व सोसायटीच्या गट सचिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.
भूम तालुक्यातील रामकुंड येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक प्रकिया सुरू आहे. यामध्ये एका उमेदवाराला संचालक पदासाठी भरलेला उमेदवारी उमेदवारी अर्ज बाद करू नये म्हणून भूमच्या सहकारी संस्थेच्या कार्यालयातील उपलेखा परिक्षक भाऊसाहेब रावसाहेब हुंबे व सोसायटीचा गटसचिव अब्दुल रऊफ काझी यांनी ३० डिसेंबरला दोन हजार रुपयांची लाच मागितली. तेव्हा उमेदवाराने लाच देण्याचे कबुल केले. दरम्यान, उमेदवाराने लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. यामध्ये मंगळवारी विभागाच्या वतीने सापळा लावला. तेव्हा हुंबे व काझी लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले. विभागाचे पोलिस निरीक्षक अशोक हुलगे यांच्या अधिपत्याखालील पोलिस अमलदार अर्जुन मारकड, सिद्धेश्वर तावसकर, विष्णु बेळे, जाकेर काझी, अविनाश आचार्य, चालक दत्तात्रय करडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.