उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 वयाची चाळीशी हा स्त्रीयाच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा आहे. या काळात मोनोपॉज मुळे होणाऱया शारीरिक व मानसिक बदलांचा बाऊ न करता योग मेडिटेशनच्या सहाय्याने स्त्रीयांनी स्वत:चे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी स्वत:हून प्रयत्न केले पाहिजेत असे मत उज्वला मसलेकर यांनी व्यक्त केले.

येथील तेजस्विनी महिला मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावेळी वस्तू रुपी वाण न देता विचार रुपी वान देण्यात आले. ’सप्तपदी पण चाळीशी नंतरची’ या विषयावर उज्वला मसलेकर व प्रगती कुलकर्णी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. श्री. अनंतदास महाराज स्मारक मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पुढे बोलताना मसलेकर म्हणाल्या की, आमच्या वेळेला असं होत, असं नव्हत, अशा भूतकाळात न रमता नातवंडांशी आताच्या काळानुरूप जोडून घेतलं पाहिजे. त्यासाठी महिलांनी अपडेट राहिलं पाहिजे, नवीन नवीन गोष्टी सतत शिकत राहिला पाहिजे.  तसेच आपला संसार झाला आता सुना, मुलींच्या संसारात ढवळाढवळ न करता त्यांना मदत करता आली पाहिजे. लागेल ती मदत करणं आणि अलिप्त राहणं हा 50 च्या पुढे सुखाचा मंत्र आहे. युक्तीच्या चार गोष्टी सांगणं मार्गदर्शन करणं पण माझाच ऐकलं पाहिजे हा अट्टाहास न धरण आपण पुढच्या पिढीशी कनेक्ट राहिले पाहिजे असेही त्या म्हणाल्या.

प्रगती कुलकर्णी यांनीही विषयावर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी मंडळाच्या अध्यक्षा प्रीता गांधी या होत्या. कार्यक्रमाचे नियोजन व सुत्रसंचालन माधवी भोसरेकर, प्रास्ताविक शुभांगी जहागीरदार, वक्त्यांचा परिचय जयश्री जोशी  तर उपस्थितांचे आभार रजनी आयाजित यांनी मानले.

यावेळी अंजली महाजन, अंजली आयाचित, मीरा मालखरे, मंजुषा पाठक, धनश्री मलखरे यांच्यासह इतर महिला मंडळातील महिलांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती.


 
Top