उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 भारत निवडणूक आयोगाने औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात 29 डिसेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व शासकीय विभागांनी आदर्श आचारसंहितेचे प्रभावी अंमलबजावणी करून निवडणूक शांततेत व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज येथे दिल्या.

 औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीशी संबंधित आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे  यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली. यावेळी नायब तहसीलदार (निवडणूक) चेतन पाटील, जिल्हा प्रिटींग प्रेसचे अध्यक्ष लक्ष्मीकांत वसंत जाधव उपस्थित होते.

 उमेदवारांनी प्रचारासाठी भारत निवडणूक आयोगाने विहित केलेल्या परवानग्या घेणे आवश्यक आहे. या परवानग्या देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात व्हिडीओ सर्व्हिलन्स टीम, भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांनी आचारसंहिता भंगाबाबत प्राप्त तक्रारींची दखल घेवून तत्काळ कार्यवाही करावी. आदर्श आचारसंहिता विषयक तक्रारी स्वीकारणे व मतदारांच्या मदतीसाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचे डॉ. ओम्बासे यांनी सांगितले.

 औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी पॉम्प्लेट, पोस्टर, बॅनरसह मुद्रित, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रचारासाठी वापरावयाचे प्रचार व्हिडीओ, ऑडीओ, बल्क मेसेज, जाहिरात मजकूर प्रसिद्धी पूर्वी प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे. यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे पूर्व प्रमाणीकरण झाल्याशिवाय जाहिरात, मजकूर प्रसिद्ध होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांनी दिल्या.


 
Top