उस्मानाबाद /प्रतिनिधी -

धाराशिव (उस्मानाबाद) चा समावेश नीती आयोगाने जाहीर केलेल्या आकांक्षीत जिल्ह्यात असून वार्षिक योजना आराखडा सन २०२३-२४ मध्ये अतिरिक्त वाढीसह आगामी अर्थसंकल्पामध्ये जिल्ह्यातील प्रकल्पांसाठी भरीव निधी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा निश्चितीच्या अनुषंगाने बैठक बोलविण्याची मागणी आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस केलीआहे.

जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न देशाच्या व राज्याच्या सरासरी दरडोई उत्पन्नापेक्षा कमी असून मानव विकास निर्देशांक देखील कमी आहे. शाश्वत सिंचन व औद्योगिकीकरणाचा अभाव, मान्सूनची अनियमितता, वारंवार उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्ती यामुळे येथील अर्थव्यवस्था कायम संकटात येते. निती आयोगाने जाहीर केलेल्या आकांशीत जिल्ह्यामध्ये धाराशिव चा समावेश असून येथील अर्थकारणाला बळकटी देण्यासाठी विशेष प्रकल्प राबविण्याची आवश्यकता आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यातील युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची क्षमता असलेल्या टेक्निकल टेक्सटाईल पार्क चा आगामी अर्थसंकल्पीय भाषणात विशेष उल्लेख करून मंजूरी देणे, सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी भरीव निधीची तरतूद तसेच जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता अतिशय अनुकुल असणारा उस्मानाबादी शेळीपालन व्यवसायासाठी फिरता निधी उपलब्ध करून देणे, जिल्ह्यात पर्यटन क्षेत्रात वाढीसाठी मोठा वाव असून येथील ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक स्थळांचा विकास करून पर्यटनाला चालना दिल्यास येथील अर्थव्यवस्थेचा कायापालट होऊ शकतो. त्यामुळे जिल्ह्याच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याची आगामी अर्थसंकल्पात घोषणा करून यासाठी भरीव निधीची तरतूद करण्याची आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी मागणी केली.

दुरुस्ती अभावी अनेक वर्षापासून पाणी असूनही तेरणा कालव्याद्वारे शेतीला पाणी दिले जात नाही. तसेच निम्न तेरणा उपसा सिंचन योजना मागील अनेक वर्षापासून बंद आहे. या दोन्ही योजना कार्यान्वित केल्यास या भागातील जवळपास ७५०० हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते. सदरील योजनांच्या दुरुस्तीचे अंदाजपत्रक शासनाकडे सादर करण्यात आले असून यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

जिल्ह्यातील को.प. बंधारे, तलाव, सिमेंट नाला बांध यांची संख्या विचारात घेता त्यांची देखभाल व दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. तसेच जिल्हा परिषदेकडे जवळपास ५००० कि.मी. चे रस्ते असून अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. जिल्ह्यातील महसुली गावांची संख्या विचारात घेता जनसुविधा अंतर्गत पायाभूत सुविधांच्या विकासाकरिता वाढीव निधीची गरज असून अनेक शाळांसाठी नवीन वर्ग खोल्या व अस्तित्वातील खोल्यांच्या दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे.या सर्व बाबींचा विचार करून सन २०२३-२४ च्या जिल्हा वार्षिक योजना आराखड्यात भरीव वाढ करण्यासह जिल्ह्यातील प्रकल्पांसाठी पर्याप्त निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे केली आहे.

 
Top