आज रक्तदान शिबीर : हरि नामाच्या गजराने दुमदुमली संत नगरी 

उस्मानाबाद (प्रतिनिधी) :-

वर्तमान काळ फार गतिमान आहे. लोकांना शॉटकट वापरुन मोठे व्हायचे आहे. त्यासाठी लोक अनेक मार्ग वापरतात. परंतु कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तुम्ही योग्यता मिळवली पाहिजे. त्यामुळे योग्यतेच्या मागे पळू नका. तुम्ही स्वत: योग्य व्हा. तेव्हा योग्यता फुलांचे हार घेऊन तुमच्या मागे धावेल, असा व्यापक कानमंत्र रामायणाचार्य हभप.रामरावजी ढोक महाराज नागपूरकर यांनी दिला आहे.

तालुक्यातील श्री.क्षेत्र तेर येथील संतधाम परिसरात हभप.गुरुवर्य संदिपान महाराज शिंदे-पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त आयोजित अमृत महोत्सवात हभप.ढोक महाराज यांचे कीर्तन झाले. तेव्हा बोलत होते.

यावेळी संतपीठावर हभप.गुरुवर्य संदिपान महाराज शिंदे-पाटील हासेगांवकर यांच्यासह हभप.शाम महाराज, हभप.उल्हास महाराज, पितांबर शास्त्री, एकनाथ कोष्टी, हभप.भगवान महाराज, हभप.अविनाश गरड, हभप.संदिपान येवले महाराज, हभप.दत्तात्रय फुलारी महाराज, सोनु शिंगाडे, हभप.पांडुरंग रेड्डी महाराज, हभप.गणेश सोनवणे महाराज, हभप.नाईक महाराज ब्रांदेकर, हभप.संतोष सबळे महाराज, हभप.गणेश बडगे महाराज, शिवराज शिंदे-पाटील, जेष्ठ संपादक गोविंद घोळवे, विनायक पुंड, नाना लोखंडे, सुनिल देवरे, रोहिजा भडकर, हभप.अशोक महाराज आपेगांवकर, हभप.महादेव महाराज बोराडे, हभप.जगन्नाथ महाराज देशमुख, हभप.नाना महाराज कदम, हभप.नारायण उत्तरेश्वर, हभप.रघुनंदन महाराज, नायगावकर बाबा, बप्पा शेळके, नामदेव उगिले,

रामकृष्ण शिंदे-पाटील, पांडुरंग थोडसरे, किरण सुर्यवंशी, दिनेश जाधव, विवेकानंद शिंदे-पाटील, शरद जाधव उपस्थित होते.

पुढे बोलताना हभप.ढोक महाराज म्हणाले की, परमार्थ हि व्यापक परंपरा आहे. त्याला जाती-धर्माच्या चौकटीतून पाहाणे, अत्यंत चुकीचे आहे. परमार्थात सगळे विखार गळून पडतात. त्यामुळे जगण्यास नवी ऊर्जा व दृष्टी मिळते. कारण, परमार्थ हे जीवनभर सुगंध देणारे अत्तर आहे. म्हणून परमार्थी माणूस विवेकशील व संवेदनशील असतो. त्यामुळे ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे वर्णन ऐकून साडे सातशे वर्षानंतरही माणसं ढसा-ढसा रडतात. म्हणून दुर्जनाचा विनाश करण्याचा सकारात्मक मार्ग परमार्थ आहे.

या अमृत सोहळ्याच्या दुपार सत्रात भागवताचार्य हभप.पद्मनाथ व्यास महाराज, वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त हभप.माऊली शिंदे महाराज आणि भागवताचार्य हभप.प्रज्ञाचक्षु मुकुंद काका जाटदेवळेकर यांची ओघवत्या भाषेत रसाळपूर्ण प्रवचने झाले.

एकादशी निमित्त संतधाम ते संत गोरोबा काका देवस्थान येथे निघालेल्या प्रासंगिक दिंडीत शेकडो भाविकांना उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती.

कार्यक्रमाचे औचित्य साधून हभप.ढोक महाराजांनी अभिष्टचिंतन सोहळामूर्ती हभप.संदिपान महाराज यांना आकर्षक फेटा, कोट, हार, शाल, श्रीफळ व सौ.कुसुमताई शिंदे यांना शाल, श्रीफळ व साडी देऊन सपत्नीक यथोचित सत्कार केला. 

आध्यात्मिक सोहळ्यात महाराष्ट्रातील अनेक सुप्रसिद्ध कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, गायक, वादक, फडकरी, गडकरी, विविध संस्थानचे अध्यक्ष, मठाधिपती तसेच जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या आळंदी व पंढरपूर शाखेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक यांच्यासह हभप.संदिपान महाराज शिंदे-पाटील यांच्यावर प्रेम करणारे भाविक-भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, हभप.संदिपान महाराज शिंदे-पाटील हासेगांवकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित अमृत महोत्सवात अध्यात्माला सामाजिकतेची जोड देण्यासाठी सह्याद्री बल्ड बॅकच्या रक्तपेढीद्वारे रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे.


 ...म्हणून तुम्ही विठ्ठल आम्ही बडवे -हभप ढोक महाराज

आज या अभिष्टचिंतन सोहळ्यात वर्षभर रोज कीर्तन ठेवावे लागतील इतके कीर्तनकार आले आहेत. कारण, संदिपान महाराजांची हि मौल्यवान कमाई आहे. आदर मागावा लागत नाही. जो पात्र आहे, त्याला आदर आपोआप मिळतो. त्यामुळे संदिपान महाराज तुम्ही सगळ्या संस्थावर राहा. कुणी काव-काव केली तर ढोक तुमच्या मागे आहे. कारण, आध्यात्मिक क्षेत्रातले तुम्ही विठ्ठल आहात आणि आम्ही बडवे, असे हभप.ढोक महारांनी म्हणताचं उपस्थितांनी टाळ्यांची दाद देत हास्यकल्लोळ केला. 


जगण्यास बळ देणारा सहज मार्ग म्हणजे संत साहित्य - हभप.चंद्रशेखर महाराज 

संत साहित्यात असलेली मानवी मूल्ये समाजिक प्रबोधनासाठी महत्त्वाची आहेत. सामाजिक परिवर्तनाच्या लढाईत संत साहित्याचे योगदान आहे. माणसाला नैराश्य किंवा नकारात्मक वाटू लागल्यास त्याला आत्मबळ देण्यासाठी संत साहित्य गरजेचे आहे. कारण, संतांच्या सहवासातून मानवाला सुखाची प्राप्ती होते. त्यामुळे जगण्यास बळ देणारा सहज मार्ग म्हणजे संत साहित्य आहे, असे प्रतिपादन हभप.चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांनी आपले हरिकीर्तन करताना केले.

 
Top