उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 गायरान आणि गावठाण जमिनीवर दीर्घकाळापासून राहत असणाऱ्या नागरिकांना न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून पंतप्रधान आवास योजने अंतर्गत नियमित करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयाची धाराशिव जिल्ह्यात प्रभावी अमंलबजावणी करण्यासाठी आपला पाठपुरावा राहील असे प्रतिपादन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.

 राज्य मंत्रिमंडळाच्या मागील बैठकीत गायरान जमिनीवर वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नियमित करण्याचा व घरकुल देण्याचा महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आणि त्यास आजच्या बैठकीत पुष्टी मिळाली. राज्य सरकार या संदर्भात मा. उच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करणार आहे. या अत्यंत दिलासादायक निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात गैरसमज व संभ्रम झालेले वातावरण दूर होउन लाखो कुटुंबांना अधिकृत जागा व हक्काचे घर मिळणार आहे.

 गावठाण क्षेत्रात निवासी प्रयोजनासाठी केलेले अतिक्रमण नियमित करण्याबाबत दि. ३१.१२.२०२२ पर्यंत कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले असून याबाबत ग्राम विकास व पंचायत राज विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री. राजेश कुमार यांनी परिपत्रक काढले असून ते सर्व जिल्हापरिषदेच्या मुख्याधिकारी यांना कळविण्यात आले आहे. त्यात प्रत्येक स्तरावरील अधिकाऱ्याने करावयाच्या कार्यवाहीचा कालावधी निश्चित करण्यात आला असून अशा सर्व जागांवर दीर्घ काळापासून राहत असणाऱ्या नागरिकांना न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून पंतप्रधान आवास योजने अंतर्गत नियमित करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयाची धाराशिव जिल्ह्यात प्रभावी अमंलबजावणी व पाठपुरावा करणार असल्याचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.


 
Top