उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद सह राज्यातील ५ आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पुर्ववत करावी, अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लोकसभेच्या १० व्या हिवाळी अिधवेशना दरम्यान केली. 

    दि. 12 डिसेंबर 2022 रोजी लोकसभेच्या 10 व्या सत्राच्या हिवाळी अधिवेशन दरम्यान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी धाराशिव येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या संदर्भात नियम 377 अंतर्गत प्रश्न उपस्थित केला यावेळी बोलताना राष्ट्रीय भारतीय चिकित्सा पद्धती परिषदेने (National Commission for Indian System of Medicine-NCISM) महाराष्ट्र राज्यातील 5 शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रियेवर निर्बंध घातले आहेत. त्यापैकी एक म्हणजे उस्मानाबाद शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय असून या महाविद्यालयांमध्ये अनेक पदे रिक्त आहेत. या आयुर्वेदिक महाविद्यालयाने कोरोना महामारीच्या काळात रुग्णांवर उपचार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आजही या महाविद्यालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. उस्मानाबाद  येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाची एकूण प्रवेश क्षमता 111 असून त्यापैकी पदवीधर प्रवेश क्षमता 63 आणि पदव्युत्तर प्रवेश क्षमता 48 आहे परंतु कर्मचाऱ्यांची कमतरता, पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे यावर्षी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया रखडली असून रद्द केली आहे आणि पदवीपूर्व प्रवेश क्षमता 48 वरून 23 वर करण्यात आली आहे. याबाबतच्या सर्व समस्या केंद्र सरकारच्या निदर्शनास आणुन देऊनही शासनाने अद्याप त्रुटी दुर केलेल्या नाहीत. त्यामुळे संसदेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील पाचही शासकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु करुन त्यावरील बंदी हटवावी आणि महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांची कमतरता, पायाभूत सुविधांची कमतरता त्वरित दूर करावी अशी मागणी यावेळी बोलताना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली.

 
Top