उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या स्वीय सहाय्यकाने उद्धट भाषा वापरून चक्क पत्रकारांशी हुज्जत घालीत  अतितायीपणा केला आहे.  जिल्ह्यातील पत्रकारांना जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतर्गत सुरू असलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी दर सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत संवाद साधण्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दि.५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता  इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडिया पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्हा माहिती अधिकारी यांच्या मार्फत सर्व पत्रकारांना निरोप दि.२ डिसेंबर रोजी पाठविले होते. त्यानुसार पत्रकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात संवाद साधण्यासाठी एकत्र जमले होते. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी काही कारणास्तव रजेवर गेल्याने त्यांचा पदभार जिल्हा ग्रामीण विकास विभागाच्या प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला. संवादासाठी वेळ होत असल्यामुळे पत्रकारांनी त्यांचे स्वीय सहाय्यक   यांच्याकडे जाऊन पत्रकार आले आहेत आपण त्यांना माहिती द्यावी अशी विनंती केली. त्यावेळी प्रयाग यांनी पत्रकारांना बैठक सुरू आहे बैठक संपल्यानंतरच मी त्यांना निरोप देणार. तसेच त्यांनी बोलावल्याशिवाय मी कॅबिनमध्ये जाऊ शकत नाही. वेळ होत असल्यामुळे पुन्हा पत्रकारांनी त्यांना विनंती केली असता मी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा पी.ए. आहे, तुमचा पी.ए. नाही, अशी अरेरावीची  भाषा वापरत पत्रकारांशी हुज्जत घातली. यानंतर पत्रकारांनी प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी काझी यांच्याशी भ्रमणध्वणीद्वारे संपर्क साधून याबाबत अवगत केले. काझी यांनी देखील प्रयाग यांना निरोप देण्याचे सांगितले मात्र त्यांनाही त्यांनी जुमानले नाही. त्यामुळे अशा अतितायीपणा करणाऱ्या  स्वीय सहाय्यकावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी पत्रकारांनी केली आहे.



 
Top