उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्ह्यातील शेतकर्‍यांची जीवनवाहिनी असलेल्या तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना बंद असल्यामुळे सभासद ऊस उत्पादक शेतकर्‍यांसह कारखान्यावर अवलंबून असलेल्या कर्मचारी व परिसरातील व्यावसायिकांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. कारखान्यावरील 350 ते 400 कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा दरवर्षी वाढत असल्याने निविदा प्रक्रिया आणि डीआरटी कोर्टाच्या निकालानुसार कारखाना तत्काळ भैरवनाथ शुगरच्या ताब्यात देऊन कारखान्याला गतवैभव प्राप्त करुन द्यावे, अशी मागणी आम आदमी पार्टीचे मराठवाडा विभाग अध्यक्ष तथा राज्य समिती सदस्य अ‍ॅड.अजित विश्वनाथ खोत यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

 निवेदनात म्हटले की, तेरणा कारखाना सुरु व्हावा म्हणून निविदा काढून 25 वर्ष भाडे तत्त्वावर भैरवनाथ शुगरला देण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती बँकेने घेतला. या निर्णयाला ट्वेन्टीवन शुगर कंपनीने न्यायालयात आव्हानदिले. त्यामुळे गेली दीड वर्षात कारखाना सुरु होऊ शकला नाही. ट्वेन्टीवन शुगरने डीआरटी कोर्टात दाखल केेलेल्या अपिलाचा निर्णय देखील भैरवनाथ शुगरच्या बाजूने लागला. त्यावेळीही आम आदमी पार्टीच्या वतीने कारखान्याचा ताबा भैरवनाथ शुगरला देण्याची मागणी केली होती, परंतु चेअरमन व संचालक मंडळाने कारखान्याचा ताबा भैरवनाथ शुगरकडे न जाता  ट्वेन्टीवन शुगरला न्यायालयात जाईपर्यंत कोणतीही कार्यवाही केली नाही. परिणामी कारखान्यावर कर्जाचा डोंगर आणखी वाढत गेला. त्यातच डीआरएटी कोर्टाने भैरवनाथ शुगर यांच्या बाजूने निकाल देऊन 30 डिसेंबर 2022 पर्यंत जैसे थे स्थितीचा आदेश दिलेला आहे. ट्वेन्टीवन शुगर ही तेरणा साखर कारखाना सुरु होऊ नये म्हणून हा प्रश्न न्यायालयात प्रलंबित ठेवण्याच्या मनःस्थितीत आहे. तर जिल्हा बँकेचे चेअरमन व संचालक देखील त्यांना सहकार्य करत आहेत. प्रकरण न्यायालयात प्रलंबित राहिल्यास तेरणा कारखान्याचे सभासद शेतकरी उद्ध्वस्त होणार असून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक स्थिती सुधारणार नाही. जिल्हा बँकेचे चेअरमन व संचालक मंडळ जाणीवपूर्वक हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित रहावे व कारखान्याचा ताबा भैरवनाथ शुगरला मिळू नये यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु जिल्हा बँक आणि तेरणा कारखाना या दोन्ही संस्थांचे पुनरुज्जीवन व्हावे यासाठी डीआरएटी कोर्टाच्या निर्णयानुसार तेरणा कारखान्याचा ताबा भैरवनाथ शुगरला देण्यात यावा. अन्यथा कारखाना आणि जिल्हा बँकेच्या होणार्‍या नुकसानीची रक्कम दिरंगाई करणार्‍या चेअरमन व संचालक मंडळाकडून वसुल करावी, अशी मागणीही अ‍ॅड. खोत यांनी केली आहे. निवेदनावर महेबूब शेख, सुरेश शेळके, संदीप अंकुशराव, संजय दणाणे, शहाजी पवार, किसन पेठे, सौदागर कांबळे, अंकुश चौगुले व इतर कार्यकर्त्यांची स्वाक्षरी आहे.


 
Top