उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 ग्रामीण भागातील नागरिकांना ग्राहक संरक्षणविषयक कायद्याची माहिती होण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. ग्राहकांना त्यांचे हक्क व अधिकाऱ्यांची जाणीव करून देण्यासोबतच त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी परिसरातील जिल्हा नियोजन भवनमध्ये आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमात ते बोलत होते.

 जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगचे अध्यक्ष मुकुंद सस्ते, जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे, उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी, नायब तहसिलदार राजाराम केलूरकर, ग्राहक पंचायत महाराष्ट्र सचिव अजित बागडे, प्रांत ग्राहक संरक्षण परिषद संघटना जिल्हाध्यक्ष संतोष केंदळे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे, शिवाजी कदम, महादेव शिंदे, नितेश काळे, श्रीमंत मुळे, जफर शेख, संतोष सरगुले, निशीकांत भोज, वर्षा शितोळे, विद्या रणदिवे आदी  यावेळी उपस्थित होते.

 शहरी भागातील ग्राहकांना आपल्या हक्क व अधिकाराबाबत काहीप्रमाणात माहिती आहे. मात्र, ग्रामीण भागातील ग्राहकांमध्ये याविषयी जनजागृती होण्याची आवश्यकता आहे. कोणतेही सेवा अथवा वस्तू खरेदी केल्यानंतर त्यासोबत मिळणाऱ्या सुविधा, विमा संरक्षण आदी बाबींची माहिती ग्राहकांना देणे आवश्यक आहे. याकरिता व्यावसायिक, विक्रेत्यांनी याबाबत ग्राहकांना योग्य मार्गदर्शन करावे, असे अपर जिल्हाधिकारी श्री. शिंदे यावेळी म्हणाले.ग्राहकांनी आपल्या न्याय हक्कासाठी सतत जागृत राहावे, असे आवाहन मुकुंद सस्ते यांनी यावेळी केले.

 प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांनी केले, तहसीलदार गणेश माळी यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी जिल्ह्यातील 181 आयएसओ मानांकन प्राप्त स्वस्त धान्य दुकानदारांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला ग्राहक, अधिकारी, कर्मचारी व स्वस्त धान्य दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top