उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने गुरुवार 29 डिसेंबर रोजी उस्मानाबाद शहरात सुप्रसिद्ध गजल गायक प्रा. राहुलदेव कदम यांच्या मराठी गजल मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील नामवंत कलाकार या मैफिलीत सहभागी होणार आहेत.

 मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेच्या वतीने नवीन वर्षाच्या स्वागतासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील भानू नगर येथील सिद्धगणेश मंदिराच्या प्रांगणात गुरुवार 29 डिसेंबर रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे, औरंगाबाद, नांदेड, परभणीसह राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरात आपल्या आशयघन शब्दप्रधान गायकीमुळे पसंतीस उतरलेल्या प्रा. राहुलदेव कदम यांचे "हे जगण्याचे भाषांतर" अनुभवण्याची सुवर्णसंधी उस्मानाबादवासीयांना लाभणार आहे.

 प्रा. कदम यांच्यासह स्वराज्य भोसले(गिटार), एनोद्दिन वारसी (बासरी), खंडेराव मुळे (तबला) तर संवादिनीवर गोविंद पवार साथ देणार आहेत. अल्पावधीतच राज्यभरात गाजलेल्या या दर्जेदार अश्या मैफिलीचे निवेदन प्रख्यात कवी रवींद्र केसकर करणार आहेत. सर्वांसाठी खुल्या असलेल्या या सुरेल मेजवानीचा नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी लाभ घ्यावा तसेच शहर व परिसरातील साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मसापचे अध्यक्ष नितीन तावडे, सचिव माधव इंगळे, कोषाध्यक्ष बालाजी तांबे तसेच पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.


 
Top