उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मागील तीन वर्षापासून ठाकरे सरकारमुळे प्रलंबित असणारा सोलापूर - तुळजापूर - धाराशिव रेल्वे मार्गाचा प्रश्न मार्गी लावत या रेल्वेमार्गासाठी रुपये ४५२.४६ कोटी मंजूर करून घेण्यासह पीक विमा मिळवून दिल्याबद्दल तुळजापूर शहरवासीयांच्या वतीने    आ. राणाजगजितसिंह पाटील यांची पेढे तुला करून त्यांना सन्मानपत्र देत गौरविण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सर्व मंत्रिमंडळाचे आभार व्यक्त करण्यात आले. तसेच रेल्वे संघर्ष समिती सदस्य श्री.बाळासाहेब शामराज व किशोर गंगणे यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करून या रेल्वे मार्गासाठी संघर्ष करणाऱ्या सर्व व्यक्तींचे आभार मानण्यात आले.

 .कुणाल जाधव मित्र मंडळाच्या वतीने यावेळी देण्यात आलेल्या सन्मानपत्रामध्ये ‘ कार्य दादांचे.. भावना बळीराजाच्या..!!’ या सदराखाली पीक विम्याबाबत त्यांनी दिलेल्या लढ्याचे व त्यांच्या प्रती असलेल्या शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत.

 आपले पिकविम्याचे कार्य म्हणजे जगाच्या पोशिंदा असलेल्या बळीराजासाठी, त्याच्या हक्काचा व कष्टाचा सन्मानच असून ऐन दिवाळीच्या तोंडावर आलेले अस्मानी संकट शेतकऱ्यांची दिवाळी गोड होऊ देणार नव्हता, मात्र तुम्ही शेतकऱ्यांचा पाठीशी खंबीरतेने उभा होता, पीकविमा मिळवून देण्यासाठी आपण अहोरात्र संघर्ष केला, न्यायालयीन लढाही दिला व शेवटी दिवाळीत आपण पीकविमा मिळवून देऊन शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा न्याय मिळवून त्यांची दिवाळी गोड केली. आपले कार्य, आपला संघर्ष, सदैव प्रेरणादायी असल्याचे सन्मान पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

  यावेळी बोलताना आ. राणाजगजीतसिंह पाटील साहेब म्हणाले की, हा रेल्वे मार्ग दोन वर्षात कसा पूर्ण होईल याबाबत आराखडा तयार करण्याच्या सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या असून शिंदे फडणवीस सरकारने हा प्रकल्प फास्ट ट्रॅकवर घेतल्याचे सांगितले. या रेल्वे मार्गामुळे जिल्ह्याचे अर्थकारण बळकट होणार आहे. विकास कामांमध्ये सर्वांचाच पुढाकार व सहभाग आवश्यक असून या रेल्वेमार्गासाठी अनेकांनी संघर्ष केला, आंदोलने केली, अगदी दिल्लीपर्यंत पाठपुरावा केला, त्या सर्वांचे आभार व ऋण आ. राणाजगजीतसिंह पाटील साहेब यांनी यावेळी व्यक्त केले. या आंदोलनामध्ये श्री.अविनाश कोळी, डॉ.पद्मसिंह पाटील सांस्कृतिक, कला व क्रीडा मंच, तुळजापूरचे अध्यक्ष श्री.बबन गावडे, श्री.राऊत, शेखभाई, श्री.अशोकराव साळुंखे, श्री.रत्नाकर खोले, ज्येष्ठ पत्रकार श्री.अंबादासराव पोपळे, श्री.विकास तांबे यांची महत्त्वाची भूमिका होती.

 यावेळी बोलताना पुढे ते म्हणाले की, स्थानिक व्यापारी व रहिवाशांना विश्वासात घेऊनच विकास कामे करण्यात येतील. आई तुळजाभवानीच्या मंदिरातील जुन्या रुढी परंपरा कायम राहतील, त्या बदलणार नाहीत. आई तुळजाभवानी मातेचे प्राचीन दागिने व मौल्यवान वस्तूंचे १० एकर जागेमध्ये संग्रहालय उभारणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. मंदिर व परिसरातील सजावटीसह स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. तसेच इतर देवस्थानाचा विकास करताना राहिलेल्या उणीव व चुकांची योग्य ती काळजी घेणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

 यावेळी विनोद पिंटू गंगणे, सचिन रोचकरी, बापू कणे, पंडितराव जगदाळे, सुहास साळुंखे, नागेश नाईक, आनंद कदले, शांताराम पेंदे, गुलचंद व्यवहारे, शिवाजीराव बोधले, नरेश अमृतराव, विजय कंदले, राजेश्वर कदम, नारायण नन्नवरे, औदुंबर कदम, किशोर साठे, किशोर गंगणे, देवा पाठक यांच्यासह बहुसंख्येने शहरवासीय उपस्थित होते.


 
Top