अमृत महोत्सवात हभप.बंडा तात्या कराडकर व हभप.अर्जुन महाराज लाड यांचे कीर्तन

उस्मानाबाद (प्रतिनिधी) :-

महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध कीर्तनकार व आळंदीतील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हभप.श्री.संदिपान महाराज शिदे-पाटील हासेगांवकर यांच्या पंच्याहत्तरी निमित्त १८ ते २१ डिसेंबर दरम्यान श्री.क्षेत्र तेर येथे आध्यात्मिक अमृत सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

त्या सोहळ्यात आज सकाळी सुप्रसिद्ध कीर्तनकार हभप.बंडा तात्या कराडकर यांच्या रसाळ व ओजस्वी कीर्तनाने प्रारंभ होणार आहे. त्यासाठी तेर नगरी सज्ज झाली असून संत गोरोबा काकांच्या पावन नगरीत आजपासून पुढील तीन दिवस वैष्णवांचा मेळा भरणार आहे. त्यामुळे परिसरातले भाविक-भक्त आनंदून गेले आहेत.

बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील हभप.संदिपान महाराज शिंदे-पाटील हासेगांवकर यांचे आध्यात्मिक व शैक्षणिक क्षेत्रातले योगदान अतुलनीय आहे. त्यामुळे हा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

सामाजिक विचारांची व्याप्ती आध्यात्माच्या माध्यमातून जनसामान्यांना पटवून देण्यात हभप.संदिपान महाराज शिंदे-पाटील हासेगांवकर यांचा हातखंडा आहे. त्यांच्या अभ्यापूर्ण कीर्तनाचे लोकांनी नेहमीच स्वागत केले आहे. तसेच त्यांच्या पुढाकारातून महाराष्ट्रातील हजारो तरुणांनी वारकरी शिक्षण घेतलं आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायात त्यांना विशेष महत्त्व आहे. त्याची नोंद घेऊन श्री.संत गोरोबा काका सेवा मंडळ व देवस्थान समितीने या अभिष्टचिंतन सोहळा आयोजनात विशेष सहकार्य केले आहे.

चार दिवसीय अमृत महोत्सव सोहळ्यात हभप.बंडा तात्या कराडकर यांच्यासह हभप.अर्जुन महाराज लाड, हभप.रामरावजी महाराज ढोक, हभप.चंद्रशेखर महाराज देगलूरकर, हभप.उल्हास महाराज सुर्यवंशी, हभप.संजय महाराज पाचपोर यांची कीर्तन तर हभप.कान्होबा महाराज देहुकर, संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज हभप.लक्ष्मण महाराज मेंगडे, हभप.श्रीकृष्णयोगी गंजीधर महाराज, भागवताचार्य हभप.पद्मनाथ महाराज, हभप.ज्ञानेश्वर माऊली शिंदे, भागवताचार्य हभप.प्रज्ञाचक्षु मुकुंद काका महाराज जाटदेवळेकर, हभप.रघुनाथजी महाराज आणि हभप.माणिक महाराज मुखेकर यांची प्रवचन सेवा होणार आहे.

अमृत महोत्सव सोहळ्याची सांगता २१ डिसेंबर रोजी हभप.संदिपान महाराज शिंदे-पाटील हासेगांवकर यांचा पंचाहत्तरी निमित्त यथोचित सत्कार आणि तुला होणार आहे. त्यानंतर हभप.चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार आहे.

या आध्यात्मिक सोहळ्यास सदगुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त, अध्यापक, आजी- माजी विद्यार्थी, नामंकित कीर्तनकार, प्रवचनकार, प्रबोधनकार, कथाकार, वादक, गायक, फडकरी, गडकरी, विविध संस्थानचे अध्यक्ष, मठपती तसेच आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी व  अभिष्टचिंतन गौरव सोहळा समितीचे प्रमुख रामकृष्ण संदिपान शिंदे-पाटील हासेगांवकर यांनी प्रसार-माध्यमांशी बोलताना दिली आहे.

 
Top