पुणे /प्रतिनिधी-

 सह्याद्रीच्या कडेकपारीतून, उंच-सखल दऱ्याखोऱ्यांतून चालतानाही जिथे छाती भरून यावी, अशा दुर्गम वाटेवर सलग पाचव्या वर्षी ही आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन घेण्यात आली. सिंहगड-राजगड-तोरणा या मराठ्यांच्या इतिहासात कोरल्या गेलेल्या गडांच्या मार्गाने ५ देश व भारतातील १५ राज्यांतील किमान ८०० धावपटूंनी 11 किलोमीटर, 25 किलोमीटर आणि 53 किलोमीटर साठी या मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला. 

वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशनने सिंहगड-राजगड-तोरणा या किल्लेमार्गावर ही अनोखी अल्ट्रा मॅरेथॉन आयोजित केली होती. तीन किल्ल्यांच्या मार्गावरील या प्रकारची डोंगरी मॅरेथॉन महाराष्ट्रात सलग पाचव्या वर्षी आयोजित करण्यात आली. त्यात इंग्लंड, मलेशिया, फिलिपाइन्स, कॅमेरून, फ्रांस, नॉर्वे, इटली या देशांसह भारतातील 15 राज्यांमधून किमान ३५ शहरांतील ८०० स्पर्धक सहभागी झाले. रविवारी सकाळी ६ वाजता सिंहगड पायथ्यालगतच्या गोळेवाडीतून मॅरेथॉन सुरू झाली. सिंहगडामार्गे विंझर साखरगाव-गुंजवणे, राजगड किल्ला, संजीवनी माची मार्ग, डोंगररांगेतून बुधला माची, तोरणा किल्ला या मार्गाने वेल्हे आणि पुढे पाबे गावात ही 53 किलोमीटरची स्पर्धा संपली. सिंहगड पायथा ते नरवीर तानाजी मालुसरे समाधी व पुन्हा पायथ्यापर्यंत अशी ११ किलोमीटरची आणि सिंहगड ते राजगड ही २५ किलोमीटरची शर्यतही झाली. 

आंतरराष्ट्रीय मान्यतेची मॅरेथॉन: 

‘एसआरटी अल्ट्रा मॅरेथॉन’ ही इंटरनॅशनल ट्रेल रनिंग संघटनेशी संलग्न आहे. २०१९ मध्ये फ्रान्समध्ये होणाऱ्या अल्ट्रा-ट्रेल डी-माँट-ब्लाँक या मॅरेथॉनसाठी ही पात्र होती. फ्रान्समधील मॅरेथॉन जगातील सर्वोत्तम माउंटन मॅरेथॉन मानली जाते. त्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक ३ गुण सिंहगड-राजगड-तोरणा अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण केलेल्या धावपटूंना मिळतील. त्यामुळे पुण्यातली माउंटन मॅरेथॉन आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे. 

शिवकालीन मार्गांवरून धावले वीर 

सिंहगड-राजगड-तोरणा हे तीन ऐतिहासिक किल्ले सह्याद्री डोंगररांगांमध्ये जोडले गेले आहेत. स्पर्धकांना मॅरेथॉनच्या वाटेत टेकड्या, गावे, जंगल, दऱ्याखोरे ओलांडत जावे लागले. कधीकाळी या परिसरात लढाया झालेल्या आहेत. त्यामुळे तलवारीच्या खणखणाटाने आणि घोड्यांच्या टापांनी दणाणून गेलेल्या भागातून धावताना धावपटूंना रोमांचक अनुभव आला. धाराशिव शहरातील श्री. बालाजी साळुंके आणि ऍड. श्री. महादेव यादव यांनी 53 किलोमीटरची सिंहगड-राजगड-तोरणा ही स्पर्धा वेळेच्या किमान एक तास अगोदर पुर्ण केली. ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी साळुंके यांना 11 तास 15 मिनिटे 35 सेकंद, तर यादव यांना 11 तास 15 मिनिटे 46 सेकंद लागले. मागील वर्षी यादव यांना ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी एक मिनिटाचा विलंब लागला होता, त्यामुळे यावर्षी त्यांनी प्रचंड मेहनत करून जिद्दीने हे अंतर वेळेत पूर्ण केले. तसेच श्री. साळुंके यांनी आत्ता पर्यंत या स्पर्धेत तीन वेळा सहभाग नोंदवला. पहिल्या वर्षी 25 किलोमीटर, आणि नंतर सलग दोन वर्षी 53 किलोमीटरचे अंतर वेळेत पूर्ण केले. तसेच धाराशिव येथील डॉ. श्री. सतीश पवार सर,  ऍड. श्री. कुमार लाखे, श्री. बालाजी पवार व लातूर डॉ. श्री. केंद्रे यांनी 25 किलोमीटरची स्पर्धा ही वेळेत पूर्ण केली. त्यामध्ये ते सिंहगडाच्या पायथ्यापासून ते राजगडाच्या पायथ्यापर्यंत कुठेही न थांबता धावले. वरील स्पर्धा सर्वांनी वेळेत पूर्ण केल्यामुळे शहरातील, राज्यातील मित्रपरिवार, नातेवाईक, आप्तेष्ट तसेच धाराशिव स्पोर्ट्स क्लब, उस्मानाबाद आणि उस्मानाबाद हाफ मॅरेथॉन ग्रुप यांच्यातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. यंदाच्या वर्षी धाराशिवमध्ये उस्मानाबाद हाफ मॅरेथॉन असल्यामुळे बरेचशे स्पर्धक सहभागी होऊ शकले नाहीत. त्यामुळे सर्व धाराशिवकरांना 18 डिसेंबर रोजी होणाऱ्या उस्मानाबाद हाफ मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

 
Top