उस्मानाबाद /प्रतिनिधी-

 जिल्हयामध्ये तुती लागवड अभियान राबविण्यात येत असून,उस्मानाबाद जिल्हयाने दहा हजार लाभार्थ्यांचे म्हणजेच दहा एकर क्षेत्रावर तुती लागवडीचे उद्दिष्ट घेतलेले आहे.या तुती लागवडीतून समृध्दीचे रेशमी उद्दिष्ट गाठण्यासाठी या अभियानात उस्फुर्तपणे सहभागी होऊन जास्तीत जास्त क्षेत्रावर तुती लागवडीचा संकल्प करावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी  केले आहे.

 उस्मानाबाद जिल्हयामध्ये तुती  या पीकासाठी असलेल्या पोषक वातावरणाचा लाभ घेवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या हेतूने सदर अभियान राबविण्यात येत आहे.जिल्हयात ज्या ग्रामपंचायतीमध्ये शंभर लाभार्थ्यापेक्षा जास्त म्हणजेच शंभर एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर लागवडीची नोंदणी होईल अशा ग्रामपंचायतीमध्ये जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम समन्वयक, जिल्हा परिषद उस्मानाबाद हे स्वत: उपस्थित राहून गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील तसेच ग्रामपंचायतीच्या इतर अडचणी समस्या व प्रश्न याबाबत चर्चा करून निराकरण करतील.

 या अभियानांतर्गत जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तीन वर्षामध्ये रुपये तीन लक्ष बेचाळीस हजार रूपये एवढे अनुदान प्राप्त करून घेवून या अनुदानाचा तुती लागवडीसाठी व रेशीम कोष उत्पादनासाठी उपयोग  करून घेवून शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न वाढवावे.

 
Top