उस्मानाबाद जिल्ह्याच्या ठिकाणापासून 67 किलोमीटरवर दक्षिण दिशेस समुद्रसपाटीपासून 530 मीटर उंचीवर हा किल्ला आहे. सीना नदीच्या खोऱ्यात परंडा हे तालुक्याचे ठिकाण आहे. मराठवाड्याच्या भूमीवरील भक्कम आणि लप्करीदृष्ट्या उत्कृष्ट अशा किल्ल्यांमध्ये परंडा किल्ल्याची गणना केली जाते. देवगिरी (दौलताबाद) नंतरचे दख्खनचे दुसरे प्रवेशद्वार म्हणून परंडा किल्ल्यास लष्करी व्यूहरचनेच्या दृष्टीने महत्व होते. मध्ययुगीन महाराष्ट्रातील लष्करी स्थापत्याचे अजोड रुप या किल्ल्यामधून स्पष्ट होते.

बदामीचा चालुक्य राजा विक्रमादित्य-1 याच्या इ.स. 672 मधील टेंभुर्णी ताम्रपटात परंड्याचा सर्वात प्राचीन उत्लेख ‘पलियंडग्राम’ असा आढळतो. त्यावेळी 4000 गावांचा समावेश असलेल्या प्रशासन विभागाचे हे मुख्य केंद्र होते. यादव राजा भिल्लम याने जिंकलेला ‘प्रत्यंडक’ प्रदेश म्हणजेच परंडा होय. परमानंद कवीच्या ‘श्री. शिवभारत’ या काव्यात परंड्याचा उल्लेख ‘प्रचंडपूर’ असा केलेला आहे. कालांतराने पलींडा, परिंडा, परंडा अशी नावे बदलत गेली.

परंडा येथील हा भुईकोट किल्ला बहामनींचा प्रसिध्द वजीर महमूद गवान याने बांधल्याचे इम्पेरिअल गॅझेटिअरमध्ये नमूद केले आहे. बहामनी राज्याच्या अखेरच्या काळात या किल्ल्यावर खाजा जहाँन उर्फ फकरू-मुल्क-दख्खनी याचे वर्चस्व होते. कालांतराने हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीच्या अधिपत्याखाली आला. त्यामुळे यास अधिक महत्व प्राप्त झाले होते.

अहमदनगर या निजामशाहीच्या राजधानीवर इ.स. 1600 मध्ये मुघलांचे वर्चस्व निर्माण झाल्यावर काही काळ मुर्तजा निजामशहा-दुसरा याने परंडा येथून आपला राज्यकारभार पाहिला. या किल्यात सन 1627 ते 1629 या काळात शहाजीराजांचे वास्तव्य होते. 1632 मध्ये हा किल्ला आदिलशहाच्या वर्चस्वाखाली आला. 18 जुलै 1632 रोजी निजामशाहीच्या किल्लेदार आका रेझावा याने परंडा किल्ला मुरारीच्या ताब्यात दिला. शिवाजी राजाचे वकील काझी हैदर यांना येथे कैदेत ठेवल्याचा उत्लेख आदळतो. पुढे हैद्राबादच्या निजामशाहीच्या काळात परंड्याचे महत्व वाढत गेले.

मध्ययुगीन काळातील हा किल्ला भक्कम बांधणीचा आहे. दुहेरी तटबंदी असलेला हा किल्ला आयताकृती आहे. त्याच्याभोवती सहा मीटर खोल आणि साधारणपणे 30 मीटर रुंदीचा खंदक आहे. काही ठिकाणी खंदकाची रुंदी कमी जास्त आहे. किल्ल्यात मुख्य प्रवेश उत्तरेकडून आहे. आत प्रवेश करण्यासाठी पूल उभारण्यात आला आहे. किल्ल्याच्या मुख्य तटाभोवती बांधलेल्या दुसऱ्या तटास शेरहाजी म्हणतात. किल्ल्यास 26 भक्कम गोलाकार बुरूज आहेत. किल्ल्यातील बुरूजाचा परिघ 37.7 मीटर आहे. परंडा किल्ला येथील तोफांसाठी प्रसिद्ध आहे. येथील तोफा लोखंडी आणि काही तोफा पंचधातूच्या आहेत. किल्ल्यातील चक्री तोफ 5.4 मीटर, मगरतोफ 4.5 मीटर लांबीची आहे. किल्ल्यामध्ये सन 1627 मधील डच ईस्ट इंडिया कंपनीचा मोनोग्राम असलेली एक तोफ 03 मीटर लांबीची आहे. याशिवाय अझदहापैकर उर्फ सर्परुपा, लांडा कसाब यासारख्या तोफा येथे संरक्षणासाठी सज्ज होत्या. किल्ल्यातील पाण्याची मुलभूत गरज भागविण्यासाठी चार प्रमुख विहिरी आहेत. पैकी दोन खंदकात आहेत.

किल्ल्यातील इमारती :-

या किल्ल्यात अनेक महत्वाच्या इमारती आहेत. त्यात  राणी महाल : किल्ल्यातील नृसिंह मंदिराच्या बाजूस राणी महाल आहे. ही वास्तू दुमजली आहे. यामध्ये पाण्याचा हौद आहे. यात पाणी सोडण्यासाठी योजलेल्या खापरी नळाचे अवशेष आजही पहावयास मिळतात.

न्यायालय : किल्ल्यातील मशिदीच्या पाठीमागे निजामकालीन न्यायालयाची इमारत आहे. 15.3 मीटर लांब, 6.9 मीटर रुंद आणि 5.1 मीटर उंच आहे. आत तीन दालने आहेत. ही इमारत आज अवशेष रुपाने  टिकून आहे.

झरोका महल : दगडी, चुनायुक्त बांधकाम असलेल्या इमारतीत लहान आकाराच्या तीन कमानी आहेत. कमानीच्या दक्षिण बाजूस लहान लहान झरोके आहेत. या इमारतीचे छत घुमटाकृती आहे.

हमामखाना : या इमारतीत दोन मोठ्या आकाराच्या चौरसदानी बांधलेल्या आहेत. त्यास एक लहान आकाराचे द्वार आहे. पहिल्या दालनाच्या मध्यभागी लहान हौद आहे. दोन्ही बांधलेल्या इमारतींच्या भिंतीत खापरी नळाचे अवशेष दिसतात. याशिवाय किल्लेदाराचे निवासस्थान आणि तटावर शौचकुपीची व्यवस्था केलेली आढळते. किल्ल्यात अंधार कोठडीची जागा आणि धान्याचे कोठार या इमारतीही आहेत.

किल्ल्यातील मंदिरे : किल्ल्यातील मशिदीच्या मागील बाजूस एका पडक्या इमारतीत किल्ल्यातील हिंदू मंदिरातील देवदेवतांची काही शिल्पे एकत्रित ठेवलेली आहेत. ही इमारत 12.9 मीटर लांब. 5.4 मीटर रूंद आणि 2.7 मीटर उंचीची आहे. इमारतीत तीन दालने आहेत. त्यात पार्श्वनाथ, नागराज शिल्प, वीरगळ, सतीशिळा आणि काही भग्न मूर्त्या आहेत. तिसऱ्या दालनात एक लहान हौद आहे. तेथे फारसी भाषेतील शिलालेख आहे. या इमारतीत प्रथम दर्शनी गणेश मूर्ती आहे. यामुळे ही इमारत गणेश मंदिर या नावाने ओळखली जाते.

नृसिंह मंदिर : आदिलशाही सरदार मुरारजगदेव यांनी हे बांधलेले मंदिर सद्यस्थितीत चौकोनी आकाराचे आहे. विटात बांधलेले आहे. मंदिराच्या गर्भगृहात नृसिंह मूर्ती आहे. या मंदिराजवळन मध्ययुगीन राजवाड्याचे अवशेष दिसून येतात. मंदिराशेजारी विहीर आहे. मंदिर परिसरात अनेक भग्नमूर्तीचे शिल्प अवशेष दिसून येतात.

महादेव मंदिर : किल्ल्यातील दक्षिण दिशेस तटबंदी आणि परकोटात हे चौकोनी आकाराचे तसेच दगडी बांधकामातील मंदिर आहे. मंदिरात शिवपिंड आणि समोर नंदीचे शिल्प आहे.

किल्ल्यातील जामा मशीद : जामा मशीद 21 X 12 मीटर (लांबी X रुंदी) ची आहे. 30 स्तंभावर आधारीत आहे. या इमारतीतील स्तंभ अलंकृत आहेत. स्तंभ आणि त्यातील कोरीव काम किल्ल्याची प्राचीनता दर्शविणारे आहे. मशीदीचे छत घुमटाकृती आहे. छतावर जाण्यासाठी डाव्या बाजूस 19 पायऱ्यांचा जीना आहे. मशिदीच्याजवळ विहीर आहे आणि उजव्या बाजूस पीर बालेशहा याची कबर आहे.

समशेर मशीद : समशेर मशीद ही दुमजली वास्तू आहे. या मशिदीस सय्यद दर्गा म्हणून ओळखले जाते.

 

श्रीकांत चंद्रकांत देशमुख

जिल्हा माहिती कार्यालय,

उस्मानाबाद

 
Top