तालुका मुख्यालय असलेले तुळजापूर क्षेत्र उस्मानाबादच्या दक्षिण दिशेस 22 किलोमीटरवर धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर (एन. एच. 211) आहे. महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठातले आद्यपीठ श्री. क्षेत्र तुळजापूर आहे. तुळजापुरची अधिष्ठात्री देवी श्री. तुळजाभवानी ही महिषमर्दिनी दुर्गेच्या रुपात आहे. महाराष्ट्रात भवानी आईची पूजा मुख्यतः तुळजापुरच्या तुळजाभवानीचीच केली जाते. ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. स्वराज्याची निर्मिती करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भोसले घराण्याची ही कुलदेवता आहे.

तुळजापूर मराठवाड्याच्या पश्चिम टोकास बालाघाट डोंगराच्या पश्चिम कड्यावरती वसले आहे. आजुबाजूच्या आंध्र, कर्नाटक या राज्यातून हजारो भक्त देवीच्या दर्शनाला नित्य येत असतात. कर्नाटकातील विशेषतः दक्षिण कन्नड प्रदेशातील सेन, कर्नाटक आणि  कदंब ही राजकुले तुळजाभवानीच्या उपासनेशी संबंधित असल्याचे मानले जाते.

तुळजापूर येथील चौदाव्या शतकातील एका शिलालेखात या स्थानाला ‘ महापूर’ असे म्हटले आहे. जुन्या कागदपत्रातून ‘ठाणे चिंचपूर’ असाही या स्थळाचा निर्देश सापडतो. अनुभूतीच्या हाकेला त्वरित थांबली म्हणून ‘त्वरिता’. त्यापासून ‘तुरजा’ आणि शेवटी ‘तुलजा’ अशा स्वरूपात आजचे ‘तुळजापूर’ नाव प्रचलित झाले आहे.

श्री. तुळजाभवानी देवीचे मंदिर आणि परिसर :

देवीचे मंदिर हे पूर्वाभिमुख आहे. रस्त्यावर दोन भव्य प्रवेशद्वार आहेत. दक्षिणेकडे राजे शहाजी दरवाजा तर उत्तरेकडील दरवाजाला राष्ट्रमाता जिजाऊ महाद्वार म्हणतात. मुख्य मंदिरात प्रवेश करताना आपण पुढे पायऱ्या उतरून खाली गेलो की, सरदार निंबाळकर दरवाज्यातून पुढे जावे लागते. खाली उतरताच समोर देवीचा होम लागतो. त्याच्या डाव्या बाजूस गोंधळ्याचा पार तर उजव्या बाजूला पालखीचा पार आहे. संपूर्ण मंदिर परिसर ओवऱ्यांनी बंदिस्त आहे. मंदिराच्या तीनही बाजूस ओवऱ्या आहेत. मंदिराच्या पाठीमागच्या बाजूस यमाई, श्रीनृसिंह, सरस्वती आणि खंडोबा यांसारख्या परिवार देवता आहेत. मंदिराच्या पाठीमागील बाजूस चिंतामणीच्या नावाने एक गोलाकार दगड आहे. भक्तगण श्रद्धेपोटी आपल्या इच्छित मनोकामनेसाठी त्याला कौल लावत असतात. पश्चिम दिशेला राजे शिवाजी महाद्वार आहे. अग्नेय दिशेस असलेल्या द्वारास टोळोबा दरवाजा म्हणतात.

तुळजाभवानीचे मुख्य मंदिर हे हेमाडपंथी शैलीतील आहे.मंदिराची रचना गर्भगृह, अंतराळ, अर्धमंडप आणि सभामंडप याप्रमाणे केलेली आहे. गर्भगृहावर भव्य शिखर आहे. खाली सिंहारूढ असलेली देवीची गंडकी शिळेतील पाषाणमूर्ती आहे. या मुख्य मंदिराला प्रवेश करण्याकरिता दक्षिण बाजूस पितळी दरवाजा, पूर्वेस कड़ी दरवाजा तर उत्तरेला चोपदार दरवाजा आहे.

श्री. तुळजाभवानीची मूर्ती :

सिंहासनारुढ असणारी देवीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे.ती गंडकी शिळेपासून बनविलेली आहे. मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ती उत्सवाकरिता काढून अन्यत्र नेता येते म्हणून तिला चल मूर्ती म्हणतात. देवीच्या प्रसन्न मुद्रेस डोक्यावर सयोनी लिंग आहे. डोक्याच्या उजव्या अंगास सूर्य तर डावीकडे चंद्र कोरलेला आहे. मूर्तीच्या खालील बाजूस मार्कडेय ऋषी हात जोडून पुराण सांगाहेत. त्याच्या वरच्या बाजूस खाली सती अनुभूती शीर्षासनावस्थेत तपश्चर्या करतानाचे शिल्प आहे. देवीच्या पाठीवर बाणांचा भाता आहे. दोन्ही पायाच्यामध्ये महिषासूराचे शीर पडलेले आहे.

देवीच्या हातात दक्षिणक्रमाने त्रिशुळ, बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र ही आयुधे आहेत. देवीच्या अंगावर चक्रकुंडले, केमद, अंगद, बांगड्या, कंठा, माला, मेखला, साखळ्या आणि पदबंध हे दागिने कोरलेले आहेत. युद्धस्थ अवस्थेत असूनही प्रसन्न दिसणारी देवीची मूर्ती पाहताना दिव्यत्वाची प्रचिती येते.

या मंदिराच्या दक्षिणाभिमुख पितळी दरवाज्यावर एक लेख कोरलेला आहे. त्यात जगदेव परमारने केलेल्या आत्मसमर्पणाची माहिती दिलेली आहे. मंदिरासमोर भव्य प्रांगण आहे. बाजुला प्रशस्त ओवऱ्या आहेत. प्रांगणात एक मोठे होमकुंड आहे. या होमकुंडासमोरील दोन दीपमाळांपैकी डावीकडील एक दीपमाळ आज शिल्लक आहे.

हैद्राबादच्या निजामाचे सरदार करमाळ्याचे रावरंभा निंबाळकर यांनी आपल्या या कुलस्वामिनीच्या मंदिराच्या बांधणीत मोठे योगदान दिलेले आहे.

तुळजापूर येथील पूजा, उत्सव, यात्रा : तुळजापूर येथे वर्षभर यात्रा चालू असते. येथे दसरा, दिवाळी, संक्रांत, गुढीपाडवा, अश्विन महिन्यातील नवरात्र आणि पौष महिन्यातील शाकंबरी नवरात्र, छबिना उत्सव लोकप्रिय आहेत.

पूजाविधी : तुळजाभवानीची पारंपरिकपणे पूजा अर्चा करण्याकरिता गावात भोपे, पाळीकर आणि उपाध्ये या तीन मंडळाचे पुजारी वर्षभर कार्यरत असतात. ते आपल्याकडे येणाऱ्या भक्तांची नोंद आपल्या दप्तरात ठेवत असतात. याला बाड म्हणतात. श्री तुळजाभवानीची दरदिवशी चार वेळा षोडषोपचारे पुजा करण्यात येते. पहाटेचे चरणतीर्थ, दुपारची महापूजा, सायंकाळी धुपआरती आणि रात्री प्रक्षाळ पूजा होते. देवीला पाचवेळा नैवेद्य दाखविला जातो. वर्षातून तीन वेळा देवीची निद्रा असते. भाद्रपद वद्य अष्टमी, ललितापंचमी, बलिप्रतिपदा, मकरसंक्रांत आणि रथसप्तमी या दिवशी देवीची अलंकार पूजा होत असते.

उत्सव : प्रत्येक मंगळवारी, प्रत्येक पौर्णिमेस, पौर्णिमेच्या अगोदरचा आणि दुसरा दिवस, गुढीपाडवा आणि बलिप्रतिपदा या दिवशी रात्री देवीचा छबिना निघत असतो. छबिन्यासाठी घोडा, मोर, सिंह अशी वेगवेगळी वाहने तयार करुन ठेवलेली आहेत. त्यावर श्रींच्या पादुका ठेवून देवालयाच्या परिसरात छबिना काढण्यात येतो. यावेळी पोतपरड्यांच्या बरोबरच आईच्या उदोकाराने सर्व परिसर गर्जुन उठतो.

विजयादशमीनंतर अश्विनी पौर्णिमेस नवरात्रातील सांगतेसाठी सोलापूरहून काठ्या येतात तर भातंगळी  (ता. लोहारा), शिरवळ, नायगाव (ता. वाई, जि. सातारा) येथील काठ्या चैत्र पौर्णिमेला उत्सवासाठी येतात. रस्त्यात देवी भक्तांचे स्वागत होते. श्रीच्या सिमोल्लंघनासाठी भिंगारहून तेथील भगत घराण्याकडून पालखी आणि श्रमनिद्रेसाठी नगरच्या पलंगे घराण्याकडून पलंग आणला जातो. या दोन्ही वस्तु थाटामाटाने मिरवत आणल्या जातात.

 

तुळजाभवानीचा गोंधळ :

देवीची स्तुतीपर कवने म्हणून उपासना करून कुलाचार म्हणून गोंधळविधी पार पाडला जातो. गणदल, गोधलपासून गोंधळ शब्द रूढ झाला. गोंधळविधी पार पाडणाऱ्या उपासकाला गोंधळी म्हणतात. महाराष्ट्रातील गोंधळ्यात कदमराई आणि रेणुराई या दोन पोटजाती आहेत. तुळजापुरातील गोंधळी कदमराईत मोडतात.

कदमराई गोंधळ्याचा वेष म्हणजे डोक्यावर कंगणीदार पगडी, पायघोळ झगा, चौसष्ट कवड्याची माळ आणि प्रत्येक कवडीनंतर रेशीम गोंडा असतो. गोंधळासाठी आठ ते 32 या प्रमाणे संख्या असते. याच्या प्रमुखाला नाईक म्हणतात. त्याच्या जोडीला मुख्य गायक, सहगायक, नर्तक, शिक, मार्दगिक आणि तालधारी यांचा समावेश असतो. संबळ आणि तुणतुणे हे गोंधळ्याचे मुख्य वाद्य आहे.

एका पाटावर नवीन वस्त्र, त्यावर तांदळाचा चौक आणि  चौकाच्या बाजुला ऊसाची किंवा ज्वारीची पाच ताट लावून चौक तयार करतात. त्यावर कडकणी अडकवितात. मध्यभागी कलशाची स्थापना करून त्यावर श्रीफळ आणि बाजुला आंब्याची पाने ठेवतात. चौकाच्या पुढे दिवा तेवत ठेवला जातो. त्याला यजमानाने तेल घालावे लागते. नवविवाहितांच्या भावी आयुष्यासाठी देवीचा आशिर्वाद मागण्यासाठी गोंधळ घालण्याचा प्रघात आहे. तुळजाभवानी मंदिरात गोंधळाकरिता स्वतंत्र पार व्यवस्था आहे. यास ‘गोंधळाचा पार’ म्हणतात.

पोतराज : महाराष्ट्रातील मरीआईचा एक उपासक म्हणजे पोतराज. तमिळ भाषेतील पोट्टुरासू या शब्दाचा अपभ्रंश म्हणजे पोतराज. प्राचीनकाळी पटकीसारखे साथीचे रोग आल्यावर गावावर देवीचा प्रकोप झाल्याचे मानून तेंव्हा मरिआईचा गाडा गावाबाहेर घालविण्यासाठी पोतराजाला निमंत्रण दिले जात असे.

एखाद्या मुलाला पोतराज म्हणून देवीला सोडून दिल्यानंतर त्याचे केस वाढविले जातात. पोतराजाचा पोशाख म्हणजे केस मोकळे सोडून कपाळी हळदी कुंकवाचा मळवट, कमरेला हिरव्या खणाचा घागरा, त्यावर घुंगराची माळ, पायात पितळी वाळा तर हातात कोरडा म्हणजे आसूड याप्रमाणे असतो. त्याच्यासोबत एक स्त्री डोक्यावर मरीआईचा देव्हारा घेऊन चालत असते. दार उघड, बया दार उघड...! याप्रमाणे आरोळी ठोकत तो आपल्या दंडावर कोरडा ओढत असतो. कधीकधी तो दाभणाने दंडावर टोचून रक्त काढत असतो. यावेळी देव्हारा घेतलेल्या स्त्रीच्या अंगात देवीचा संचार होऊ लागताच तिला प्रश्न विचारून त्यावर उपाय सांगितले जातात. भक्तगण देवीची यथासांग पूजा करून पोतराजाला धान्य अर्पण करतात. पोतराज हा महाराष्ट्रातील देवी उपासकातील एक महत्वपूर्ण घटक मानला जातो.

कुंकू, कवड्याची माळ, पोत आणि परडी :

तुळजाभवानी देवी ही स्त्रित्वाचे प्रतीक म्हणून कुंकवाला खूप महत्व आहे. तुळजापुरात अस्सल स्वरुपातील कुंकू मिळते. सौभाग्यलेणं आणि कुंकवाचा सड़ा टाकण्याच्या प्रथेमुळे तुळजापुरात मोठ्या प्रमाणात कुंकवाचा वापर होताना दिसतो.

प्राचीनकाळी कवडी हे चलन असल्याने कवड्याची माळ हे लक्ष्मीचे प्रतीक आहे. 64 कवड्यांची माळ ही 64 योगिनीचे प्रतिकात्मक रुप आहे. तुळजापुरात कवड्याची माळ ही अंबुकी कवडी आणि येडाई कवडी या दोन प्रकारात बनवतात. कवडी चेन्नईवरून तर त्याच्या गोफाचा वाक कोलकात्यावरून मागवितात.

देविचे रुप शाक्ताचे ! तर शाक्ताचे सर्व विधी रात्रीच्यावेळी साजरे होत असल्याने देवीभक्तांच्या  हातात पोत असतो. मनातील अहंकार जाळण्याचे प्रतीक असणारा पोत जुन्या किंवा नव्या कपड्यापासून पीळ घालून तयार केला जातो. भक्तगण आपल्या कुवतीप्रमाणे पोत करताना त्यात सोने, रुपे, हिरे किंवा पैसे अशा मौल्यवान वस्तू ठेवतात. तुळजाभवानी ही जगज्जेती तर तिचा भक्त हा याचक आहे. याचकाचे प्रतीक परडी म्हणून परडीचा वापर केला जातो. बांबू हा वंशवेलाचे प्रतीक असल्याने त्यापासून परडी तयार केली जाते. परडीतही दोन प्रकार असतात मोठ्या परडीला रेणूका तर लहान परडीला परशुराम म्हणतात. अशारितीने उत्सव आणि वैभवाचे प्रतीक म्हणून कुंकू आणि कवड्याची माळ, अहंकाराचे दमन म्हणून पोत, तर याचकाच्या रुपातील परडी देवीचे धार्मिक स्वरुपातील अलंकार आहेत.

 

 

काळभैरव :

भगवान शंकराचे गण म्हणजेच भैरव होय. कुठल्याही देवी मंदिराच्या अष्टदिशांना आठ भैरव असतात. पैकी काळभैरवाचे स्थान सर्वात वरचे असते. त्याला काशीचा कोतवाल म्हणतात. रात्रीच्या समयी आपल्या परिसराची निगराणी करण्याकरीता काळभैरव बाहेर पडतात, अशी आख्यायिका आहे. त्यानुसार काळभैरवांचे रुपही तेवढेच भयानक असते बाहेर काढलेली जिभ, हातात नरमुंड माळा, कमरेला सापाचे वेष्टन, हातात त्रिशुळ याप्रमाणे काळभैरवांचे रुप असते. देवी मंदिराच्यालगत दक्षिणेला काळभैरवाच ठाणे आहे. तेही हेमाडपंथी शैलीत आहे.

सकाळ-संध्याकाळ काळभैरवाची पूजा केली जाते. या पूजेचे वैशिष्ट्य म्हणजे काळभैरवाला नैवेद्य दाखविल्यानंतर गांजाची चिलीम दिली जाते. अश्विन अमावस्येला काळभैरवाच्या मंदिरातून भेंडोळी निघून ती देवी मंदिराच्या गाभाऱ्यात जाते, तो क्षण पाहण्यासारखा असतो. एका काठीला पेटते पलिते लावून तरुणवर्ग ती काठी खांद्यावरून वाहून नेतात. तुळजाभवानी मंदिराइतकेच काळभैरवाचे स्थान प्राचीन आहे. या मंदिराकडेही भरपूर दानपात्रे उपलब्ध आहेत. काळभैरवासोबत मुख्य मंदिराच्या अग्नेय दिशेला टोळ भैरवाचे हेमाडपंथी शैलीतील मंदिर आहे. त्याचीपण पारंपरिक स्वरूपात पूजा केली जाते. त्याच्या पुजाऱ्यांना टोळे (शिंदे) हे नाव पडलेले आहे. याशिवाय तुळजापुरात चारही बाजूला भैरवाची ठाणी आहेत. एकंदर देवीचे गण म्हणून आठही दिशेला अष्टभैरवाचे स्थान याही ठिकाणी पाहण्यास मिळते.

रामवरदायिनी :

रावणाचा वध करण्यासाठी रामाला वर देणारी ती रामवरदायिनी. रामवरदायिनी हे महिषमर्दिनीचेच एक रूप आहे. तुळजाभवानी मंदिराच्या उत्तरेला एका डोंगरकड्यावर रामवरदायिनीचे मंदिर पूर्वाभिमुख असले तरी देवीची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे. आपल्या बोटाने दिशा दर्शविताना स्पष्टपणे जाणवते. रामवरदायिनीची मूर्ती छोटीशी असली तरी अतिशय सुबक आहे. महिषमर्दिनी असल्याने अष्टभुजा असून मूर्तीच्या प्रत्येक हातात आयुधे आहेत.

रामवरदायिनी मंदिराच्या बाजुलाच रामेश्वराचे एक मंदिर आहे.त्यात रामाची मूर्ती आहे. मंदिरालगत डोंगराची उतरण लागते. त्यात लक्ष्मणेश्वराचे मंदिर आहे. याच ठिकाणी रामतीर्थ, सूर्य आणि चंद्रकुंड आहे. खालच्या बाजुला प्रचंड दरी आहे. तिला रामदरा म्हणतात. अशा रितीने रामवरदायिनी मंदिराच्या परिसरात संपूर्ण रामायण साकारले आहे.

रामवरदायिनीचे पुजारीपण वाळके-सुरवसे घराण्याकडे आहे. सतराव्या शतकात विजापूरच्या आदिलशाहने या घराण्याला दिलेली दानपत्रे उपलब्ध आहेत. रामवरदायिनीचे मंदिर प्राचीन आहे.त्याच्या  देखाभाल दुरूस्तीची गरज आहे.

घाटशीळ मंदिर :

सोलापूरहून तुळजापूरला येताना समोर बालाघाटचा डोंगर लागतो आणि याच डोंगरावर एक छोटेसे परंतु टुमदार मंदिर लागते, तेच घाटशीळ मंदिर होय. नावाप्रमाणे तुळजापूरच्या दक्षिण बाजूला घाटामध्ये एक भलीमोठी शीळ म्हणजे दगड आहे.त्यावरच हे मंदिर बांधलेले आहे.

घाटशीळेचा संदर्भ रामायणाशी जोडला जातो. त्यानुसार रावणाने सीतेला पळवून नेल्यानंतर लंकेच्या दिशेने जाणाऱ्या रामाने सीतेचा शोध घेत घेत दंडकारण्यातील या परिसरात आले असता आई तुळजाभवानीने याच शिळेवर उभे राहून रामाला लंकेचा मार्ग दाखविला. अशा प्रकारची आख्यायिका सांगितले जाते.त्यामुळे या  घाटशीळेला महत्व प्राप्त झाले आहे. या अर्थाने उत्तर भारत ते श्रीलंका या दरम्यानचा मैलाचा दगड म्हणून घाटशीळेकडे पाहता येईल.

तुळजापूरला आल्यानंतर भाविक मोठ्या भक्तिभावाने घाटशीळेच्या दर्शनासाठी आवर्जुन जात असतात. रात्रीच्यावेळी तुळजापूरचा घाट चढताना घाटशिळेचे मंदिर लक्ष वेधून घेते.

 

श्रीकांत चंद्रकांत देशमुख

जिल्हा माहिती कार्यालय,

उस्मानाबाद

 
Top