नळदुर्ग  / प्रतिनिधी-

 मनावर ताबा ठेवणे हे येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांसाठी अतीशय कठीण जाणार आहे. कारण आजच्या मोबाईल युगात विद्यार्थ्यांचे मन चंचल झाले आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांनी मन एकाग्र ठेऊन आपली वाटचाल सुरू करावी असे नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांनी नळदुर्ग येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलतांना म्हटले आहे.

 नळदुर्ग येथील सम्यक सेवाभावी संस्था संचलित डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल मध्ये दि.८ नोव्हेंबर रोजी इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सरकारचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन युवा उद्योजक सचिन धरणे व पत्रकार विलास येडगे हे उपस्थित होते.

  प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे पुजन करण्यात आले. यानंतर सर्व मान्यवरांचा संस्थेचे अध्यक्ष मारुती खारवे यांनी सत्कार केला. यानंतर शाळेतील इयत्ता दहावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये शाळेची विद्यार्थीनी मृदुला सुहास पुराणिक ही संपुर्ण नळदुर्ग केंद्रात प्रथम आली आहे. यावेळी तीचा विशेष सत्कार करण्यात आला.

 यावेळी बोलताना सपोनि सिद्धेश्वर गोरे यांनी म्हटले की, विद्यार्थ्यांनी शिक्षण, खेळ, कला यासह विविध क्षेत्रात आपले करीअर घडवावे. अभ्यासाबरोबरच आपल्या अंगातील कलागुणांनाही विकसित करण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिरेक वापर टाळावा. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात मोठा फरक आहे. शाळेत तुम्हाला अनेक निर्बंध असतात. शाळेत नियमित येणे बंधनकारक असते मात्र महाविद्यालयात तसा प्रकार नसतो.विद्यार्थ्यांनी प्रामाणिक व चिकाटीने अभ्यास करून यशस्वी होण्याचा प्रयत्न करावा असेही सपोनि गोरे यांनी म्हटले आहे.यावेळी सचिन धरणे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनीही अतीशय सुंदर असे भाषण केले.

 प्रस्तावित संस्थेचे अध्यक्ष मारुती खारवे यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार शाळेच्या विद्यार्थिनीने मानले.या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top