उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील कलाकारांच्या टीमची निवड करण्यात येत आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा उस्मानाबादच्यावतीने कलाकारांच्या निवड चाचणीचे उद्घाटन नायब तहसिलदार राजाराम केलूरकर यांच्या हस्ते नगरपरिषदेच्या प्रांगणात  असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात करण्यात आले.  

अखिल भारतीय नाट्य परिषद ही गेल्या ९ वर्षापासून राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी होत आहे. गेल्या ९ वर्षापासून ही शाखा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत असून उस्मानाबाद जिल्ह्याचा देशात कला क्षेत्रामध्ये डंका आहे. तर याही वर्षी उस्मानाबाद जिल्ह्यातील १८ ते २८ वर्षे वयोगटातील कलाकारांची निवड करण्यात येणार आहे. तसेच निवड केलेल्या कलाकारांच्या स्पर्धा घेऊन यामध्ये कलाकारीचे व्यवस्थित गट आहेत अशा  १२ युवक व १२ युवती कलाकारांची निवड केली जाणार आहे. या २४ कलाकारांच्या टीमची डिसेंबरपर्यंत चांगल्या पद्धतीने सराव करून घेतला जाणार आहे. ही एकच टीम राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उस्मानाबाद शाखेचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सागर चव्हाण, सुगत सोनवणे, सुहास झेंडे आदीसह इतर सदस्यांची टीम कलाकारांची निवड करीत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कलाकारांनी या निवडी प्रक्रियेसाठी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन विशाल शिंगाडे यांनी केले आहे.


 
Top