परंडा /प्रतिनिधी-

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज परंडा शहरामध्ये मोर्चा काढण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज चौकातून या मोर्चास सुरुवात झाली. एकच मिशन, ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण, सकल मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाचे बापाचे, आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

मराठा समाजाच्या वतीने परंडा तहसील कार्यालयावर आज ‘मराठा महामोर्चा’ आयोजित करण्यात आला होता. मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे व ओबीसी प्रवर्गातील ५० टक्क्याच्या चौकटीमधून आरक्षण द्यावे, अशी या आंदोलनातील प्रमुख मागणी होती. या मोर्चाला तालुक्यातील ९६ गावनिहाय बैठका घेण्यात आल्या होत्या. आज सकाळी ११ वाजता छत्रपती संभाजी महाराज चौकातून या मोर्चाला प्रांरभ झाला. मोर्चा गफार शहा कोटला मैदान प्रांगणात आल्यानंतर पाच विद्यार्थीनींची भाषणे झाली. त्यानंतर मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.


 
Top