उस्मानाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणापासून 57 किलोमीटरवर आग्नेय दिशेस नळदुर्ग आहे. 1904 पर्यंत हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण होते. मुंबई-पुणे-सोलापूर-हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गावरील हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 670 मीटर उंचीवर आहे. हा किल्ला दोन वेगवेगळ्या कालखंडात दोन वेगळ्या शासकांनी बांधला. किल्ल्याचा मूळ भाग किल्ल्यातील पाणी महालाच्या पश्चिमेस आहे. तो रणमंडळ या नावाने ओळखला जातो. या किल्ल्याची बांधणी झाली त्यावेळी तो मातीचा किल्ला होता. चालुक्य तैल दुसरा यांचा सामंत नलराजा याने इ स. 993 मध्ये नळदुर्ग किल्ला बांधल्याचे तेथील शिलालेखावरून स्पष्ट होते. स्थानिक लोक त्याचा इतिहास पौराणिक काळातील नळ-दमयंतीपर्यंत घेऊन जातात. बहामनी काळात या किल्ल्याचे दगडी बांधकामात रुपांतर केले गेले.

  नळदुर्गच्या उत्तरेस बोरी नदी वाहते. ती उत्तर-पूर्व दिशेने किल्ल्याला वेढा घालत दक्षिणेकडे पुढे निघून जाते. अग्नेय टोकाकडे पाणी अडवून ते पश्चिमेच्या खंदकात भरण्याची कल्पना प्रत्यक्षात आणून आणि नदीला एक फाटा फोडून तो पश्चिमेकडून दक्षिणेला नेऊन नदीला मिळविणे तसेच दुसरा फाटा दुर्गाजवळ फिरवून त्यावर बंधारा बांधून त्या जलाशयाचा उपयोग दुर्ग संरक्षणासाठी केला आहे. दुर्गाभोवती फिरवलेल्या या नदीच्या पाण्याने दुहेरी तटाच्या किल्ल्याभोवती पाण्याचा आणखी एक तट उभा केला आणि किल्याभोवती फिरवलेल्या पात्रामधून किल्यातील पाण्याची गरज भागविली आहे. बहामनीनंतरच्या काळात विजापूरच्या अली आदिलशहा आणि इब्राहिम आदिलशहा यांच्या काळात नळदुर्ग किल्ल्यास अभेद्य बनविण्यात आले आणि त्यास शाहदुर्ग या नावाने ओळखले जाऊ लागले. आदिलशाही, निजामशाही, बरीदशाही या तीन राज्यांच्या सरहद्दीवरील या किल्ल्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी अनेक वेळा संघर्ष झाले. कालांतराने 14 मे 1677 रोजी या किल्ल्यावर मुघलांचे वर्चस्व निर्माण झाले. या काळात हा किल्ला नळदुर्ग या नावानेच ओळखला जाऊ लागला. सन 1852 ते 1857 या काळात कर्नल मेडोज टेलर हा येथे कलेक्टर म्हणून कार्यरत होता. त्याच्या ‘स्टोरी इन माय लाईफ’ या ग्रंथात त्याने नळदुर्ग किल्ल्याचे वर्णन केले आहे. मेडोज टेलरने या किल्ल्यास भेट दिली तेव्हा तो उदगारला, The fort of Naldurg is one of the most intresting place I have seen (आजपर्यंत मी पाहिलेल्या अनेक स्थळात नळदुर्गचा किल्ला हे मोठे आकर्षक ठिकाण आहे.)

 अभेद्य दुहेरी दगडी तटबंदी आणि पहिल्या तटाभोवती खंदक असलेल्या किल्ल्याचे क्षेत्रफळ 126 एकरचे आहे. किल्ल्यात असलेले 114 बुरूज किल्ल्याची भव्यता स्पष्ट करतात. किल्ल्यातील बुरुजांना ढालकाठीचा बुरूज, नव बुरूज, उफळ्या उर्फ टेहळणीचा बुरूज, परंडा बुरूज अशी नावे आहेत. किल्ल्याच्या दक्षिणेस एकास एक असे नऊ बुरुज असलेल्या नवबुरूजास पाकळ्यांचा बुरूज असेही म्हणतात. किल्ल्यातील सर्वात उंच असलेला टेहळणीचा बुरूज (उफळ्या बुरूज) वैशिष्ट्यपूर्ण आहे. तो 30.5 मीटर उंच आहे. त्यावर जाण्यासाठी 5 ते 5.5 मीटर रूंदीच्या 78 पायऱ्या आहेत. बुरूजावर दोन तोफा आहेत. उफळ्या बुरूजावर जाणाऱ्या पायऱ्या जवळच एका कोष्टात खंडोबाचे स्थान दाखविले जाते. राजा नळाची राणी दमयंतीने प्रार्थना केल्यावर हा खंडोबा मैलारपुरावरून येथे येऊन स्थायिक झाल्याचे सांगितले जाते. या बुरूजाच्या पायथ्याशी पाण्याचा हौद आहे. रणमंडलावर जाण्यासाठी उफळ्या बुरुजाच्या अलीकडून एक मार्ग आहे. या मार्गावरच गंडभेरूडाचे शिल्प कोरलेले आहे. ते केवळ पक्षीरूप गंडभेरूड या प्रकारातील आहे.

 तोफा: किल्ल्यात एकूण 12 तोफा आहेत. पैकी मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर चौथऱ्यावर चार तोफा, उफळ्या बुरूजावर दोन तोफा (पैकी एका तोफेचे तोंड पशूचे आहे.) किल्ल्यातील राज्य पुरातत्व खात्याच्या कार्यालयाच्या आवारात पंचधातुच्या तोफा आणि असंख्य तोफगोळे आहेत.

 किल्ल्यातील इमारती : किल्ल्यात हत्तीखाना, दारुगोळा कोठार, धान्यकोठार, जोड इमारत, शिवकालीन इमारत, रंगमहाल, बारादारी- राजवाडा. राणी महाल, तुरूंग कोठडी आदी इमारती आहेत.

 किल्लेदाराचा वाडा : किल्ल्यात प्रवेश केल्यावर आत जाताना प्रथम हत्तीखाना आणि त्यानंतर काही पडक्या इमारती लागतात. तसेच पुढे गेल्यास डाव्या हातास जामा मशीद आणि उजव्या हाताला किल्लेदाराचा वाडा लागतो. या इमारतीच्या मधोमध एका मोकळ्या चौकात दोन फारशी शिलालेख, काही कोरीव दगडी शिल्प, नगाऱ्याची लोखंडी पात्रे, पंच धातुची तोफ आणि असंख्य तोफगोळे पडलेले आहेत.

 दारूचे कोठार : उफळ्या बुरूजाला लागूनच दारूचे कोठार आहे. याला लागूनच असलेली दुसरी इमारत धान्याचे कोठार असावे.

 पाणी महाल: मध्ययुगीन कालखंडातील वास्तुशास्त्रातील प्रगती दर्शविणारी नळदुर्ग किल्ल्यातील सर्वात प्रेक्षणीय वास्तू म्हणजेच पाणी महाल होय. या गूढ अद्भुत चिरेबंदी वास्तूचे  सौंदर्य त्याच्या अंगावरून कोसळणाऱ्या जलधारेत आहे. किल्ल्याच्या मधून वाहणाऱ्या बोरी नदीच्या पात्रात एक बंधारा बांधून या नदीचे पाणी अडविण्यात आले आहे आणि त्याचा वापर किल्ल्यातील पाणीमहाल इमारतीसाठी करण्यात आला आहे. 174 मीटर लांब आणि 2.5 ते 14 मीटर रुंद तसेच 19 मीटर उंच असणाऱ्या या बंधाऱ्याच्या पोटात अत्यंत हवेशीर असा पाणी महाल उर्फ जलमहाल बांधलेला आहे. नदीचे पाणी बंधाऱ्यात साठते आणि बंधाऱ्यातील पाण्याचा प्रवाह या इमारतीवरून नर आणि मादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांडव्यातून वाहतो. (नर आणि मादी ही स्थानिक नावे आहेत) विशेष म्हणजे पाणी वाहत असताना इमारतीच्या कोणत्याही भागाला या पाण्याचा स्पर्श होत नाही.

    पाणी महालापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या आहेत. त्या उतरून गेल्या की, बंधाऱ्याच्या अर्ध्या उंचीवर डावीकडील वाट पाणी महालात घेऊन जाते. आत उतरताना अंधार जाणवतो. परंतु एकदा आत उतरल्यानंतर प्रकाश आहे. पश्चिमेकडील भिंतीवर फारशी भोषेतील एक शिलालेख आहे. ‘आजदीदन इ चष्म मुहिब्बान रोशन मीग दर्द आणि चष्म दुष्मनान गदर्द कूर’ त्याचा मराठी अनुवाद पुढीलप्रमाणे आहे - ‘या महालास मित्रत्वाच्या दृष्टीने पाहिल्यास डोळे दिपून जातील आणि शत्रुत्वाच्या दृष्टीने पाहिल्यास डोळ्यापुढे अंधःकार येईल.’

  याच्या उत्तरेकडे तोंड असलेली आयताकृती दालने आणि त्याला लागूनच डोकावणारा नऊ गवाक्षांचा रेखीव सज्जा आहे. या गवाक्षातून सांडव्यातून कोसळणारे पाणी पाहणे, हे दृष्य मोठे विलोभनीय दिसते. पाणी महालास जोडून स्नानगृह आणि शौचकुपी आहे. उत्तरेकडील बाजुकडे एक गणपतीची मूर्ती एका दगडी पट्टीत कोरलेली आहे. या खोलीस गणेश महाल असे म्हणतात. नदीच्या प्रवाहाचा आणखीन एक उपयोग तत्कालीन राज्यकर्त्यांनी करून घेतला आहे. पडणाऱ्या पाण्यातून निर्माण होणारी ऊर्जा त्यांनी पानचक्कीसाठी वापरली आहे. तिच्या सहाय्याने धान्य दळले जात होते. म्हणूनच मध्ययुगीन कालखंडात हा किल्ला वैशिष्ट्यपूर्ण समजला जातो. पाणी महालाचे बांधकाम इ. स.1560 मध्ये अबुल मुजफ्फर अली अदिलशहा पहिला याने ख्वाजा नियमततुल्लाह याच्या देखरेखीखाली करवून घेतले, असे सांगितले जाते.


श्रीकांत चंद्रकांत देशमुख

जिल्हा माहिती कार्यालय,उस्मानाबाद

 
Top