उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 येथील परंडा तालुक्यात 27 आणि 28 नोव्हेंबर 2022 रोजी होणाऱ्या महाआरोग्य शिबीराच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी आज पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक घेतली.

 यावेळी भूम-परंडा उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे, जिल्हा शल्यचिकित्सिक डॉ.राज पाटील-गलांडे, डॉ.धर्मेद्रकुमार, डॉ.इस्माईल मुल्ला, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, जिल्हा आरोग्‍य अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी, नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वडेपल्लीवार, तालुका आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते.

 यावेळी जिल्हाधिकारी यांनी या आरोग्य शिबीरामध्ये ग्रामीण भागातून रुग्णांना ने आण करण्यासाठी एक वाहन एक आशा सेवक तसेच प्रत्येक गावातून ग्रामसेवक किंवा शिक्षकाची सेवा घेण्याबाबत आणि वाहनांच्या उपलब्धतेबाबत उपप्रा‍देशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांना सूचना केल्या. या बैठकीत येणाऱ्या रुग्णांच्या आणि डॉक्टर्स तसेच मेडिकल स्टाफच्या सुविधांबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

  तत्पूर्वी जिल्हाधिकारी यांनी कोटला मैदान येथे होणाऱ्या तयारीची प्रत्यक्ष पाहणी केली. याठिकाणी महिला, पुरुष,मुले, लहान मुले, वयोवृध्द नागरिक यांच्यासाठी केलेल्या नियोजनाचा आढावा घेतला. महाआरोग्य मेळाव्यात लाखोंच्या संख्येत येणाऱ्या रुग्णांना आरोग्य सुविधा व्यवस्थितरित्या मिळावी यासाठी आरोग्य विभागाने केलेल्या औषधे आणि डॉक्टरांच्या नियोजित कॅबीन्स आणि इक्विपमेंट बाबत चौकशी केली. देशभरातून येणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवास आणि जेवणाची व्यवस्थेबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. याठिकाणी पर्याप्त मात्रेत पाणी, स्वच्छता गृहे, पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि पार्कींगची व्यवस्था करण्याबाबत नगर परिषदेच्या मुख्याधिऱ्यांना सूचना केल्या.

 
Top