उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 राज्यात अनेक ठिकाणी बालगह आहेत, परंतु उस्मानाबाद जिल्ह्यातील मुलींचे मतीमंद गृह आणि आपलं घर बालगृह ही दोन ठिकाणे इतर कोणत्याही जिल्ह्यापेक्षा चांगल्या स्थितीत आहेत, असे श्री.यादव यावेळी म्हणाले.

 नळदुर्ग येथील आपलं घर बालगृह येथे जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सव उद्घाटन कार्यक्रमात श्री यादव बोलत होते. समाजातील बरेच नागरिक फॉस्टर केअर बद्दल अनभिज्ञ आहेत. त्यामुळेच बरीच मुलं बालगृहातच राहतात. पुढे ते म्हणाले की मागील आठवड्यातच भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्या घरी देखील एक फॉस्टर केअर मधून बालक आणण्यात आले आहे. जिथे जिथे बाल कामगार अन्याय होतात त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन होते, तेंव्हा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हे स्वत: महिला बाल विकास अधिकारी, जि.प.चे समाज कल्याण अधिकारी यांच्या सहकार्याने बालकांच्या अधिकारांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली जाते. तसेच बालकल्याण समिती आणि बाल न्याय मंडळ  हे प्रत्येक बालकाला त्यांचे अधिकार आणि संरक्षण करण्यास मोफत विधी सेवा पुरवतो. कोणत्याही बालकामगार किंवा बालकांवर जर अन्याय होत असेल तर चोवीस तास माझी सेवा उपलब्ध आहे, येथील मुलांसाठी व्यायाम शाळेचा प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे पाठवावा आणि राज्य शासनाचे अनाथ मुलांसाठी शासकीय नोकरीत एक टक्के आरक्षणचाही लाभ प्रत्येक अनाथांनी घ्यावा, असेही श्री.यादव यावेळी म्हणाले.

 यावेळी जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी एस.व्ही.अंकुश, आपलं घर बालगृह संस्थेचे अध्यक्ष पन्नालाल सुराणा, बालकल्याण समितीचे अध्यक्ष विजयकुमार माने, आपलं घर संस्थेचे सचिव गुंडू पवार, वाल न्याय मंडळाचे सदस्य ए.डी.कदम, दयानंद काळुंके, ॲड.दिपाली जहागीरदार, ॲड.सुजाता माळी, जिल्हा परिविक्षा अधिकारी शिरीष शेळके, धरित्री विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता शहा, संरक्षण अधिकारी कोमल धनवडे, प्रज्ञा बनसोडे, क्षेत्रिय कार्यकर्ती जयश्री पाटील, माहिती विश्लेषक विजय पवार, हर्षवर्धन सेलमोहकर, शारदा गंडले, राहुल देशमुख, राऊ भोसले आदी उपस्थित होते.

   महिला व बाल विकास विभागांतर्गत जिल्ह्यातील कार्यरत बालगृहात दाखल झालेल्या अनाथ, निराधार, निराश्रीत व उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देवून त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी दि.23 ते 25 नोव्हेंबर 2022 या कालावधीत नळदुर्ग येथील आपलं घर बालगृह येथे जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सव 2022 चे आयोजन करण्यात आले आहे.

  संस्थेचे अध्यक्ष पन्नालाल सुराणा यांनी मुलांना मार्गदर्शन करताना देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी देशासाठी केलेल्या बलिदान आणि स्वातंत्र्याच्या लढ्यात केलेल्या कामाचा उल्लेख केला. ते म्हणाले इंग्राजांच्या जुलमी राजवटीत पंडीतजींना अनेक वेळा तुरुंगात जावे लागले. या कैदेच्या काळात सुध्दा चाचा नेहरु यांनी पुस्तकांचे वाचन मोठ्या प्रमाणात चालूच ठेवले होते. त्यांची प्रेरणा घेऊन आपणही वाचन आणि शिक्षणाचे मार्ग कधी सोडू नयेत आणि प्रत्येक परिस्थितीत पुस्तकांची साथ सोडू नये. शिक्षणाचा उद्देश फक्त नोकरी न ठेवता उद्योग, शेती व खेळांकडे लक्ष देऊन उच्च शिक्षित व्हावे, असेही म्हणाले.

   या बालमहोत्सवामध्ये जिल्ह्यातील विविध बालगृहातील मुलांमुलींने सहभाग घेतला तसेच वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धा 25 नोव्हेंबर पर्यंत सुरु राहणार आहेत. तरी नागरिकांनी अनाथ बालकांचा उत्साह वाढविण्यासाठी सदर कार्यक्रमांस उपस्थित राहून त्यांचे मनोबल वाढवावे.

 कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी आणि बालगृहातील मुलांनी बालविवाह निर्मुलन बाबत शपथ घेतली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस.व्ही.अंकुश यांनी केले, तर सूत्रसंचालन महिला व बालविकास संरक्षण अधिकारी प्रज्ञा बनसोडे यांनी केले आणि आभार प्रदर्शन जिल्हा परिविक्षा अधिकारी शिरीष शेळके यांनी केले.


 
Top