उस्मानाबाद / प्रतिनिधी-

सोलापूर - उमरगा राष्ट्रीय महामार्गाच्या प्रलंबित कामाबाबत आ. राणाजगजीतसिंह पाटील यांनी महामार्गाची पाहणी करून प्रकल्प संचालक श्री. चिटणीस व इतर संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली होती. महामार्गाची कामे सुरू न केल्यास टोल वसूली बंद करण्याचा निर्णय घेण्यास भाग पडू असे त्यावेळी प्रकल्प संचालकांना निक्षून सांगितले होते. सदरील बैठकीमध्ये विद्यमान कंत्राटदार सक्षम नसल्याने उर्वरित कामे इतर कंत्राटदारामार्फत करण्याचे निश्चित झाले होते व त्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सक्षम अधिकाऱ्यांची तत्त्वतः मान्यता देखील प्राप्त झाली आहे.आहे अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी दिली आहे.

उर्वरित कामासाठी आवश्यक रु. २८२ कोटीच्या कामाच्या निविदा प्रक्रियेची कार्यवाही वेगाने सुरू असून सदरील कामे डिसेंबरमध्ये सुरू होणार आहेत. मात्र नेहमी प्रमाणे आयत्या पिठावर रेगोट्या मारणाऱ्या काही लोकप्रतिनिधींनी दिखाऊ बैठक घेत आंदोलनाचा नाटकी इशारा दिला आहे.

राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्ती व देखभालीच्या कामाची निविदा प्रक्रिया पीडब्लुडी मार्फत सुरू असून दि २१. १०/२०२२ रोजी कामाच्या निविदा मागण्यात आल्या आहेत. त्याच प्रमाणे कन्शेशनर कडून मे. टीएमपीएल व मे. एव्हरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपर्स कंपनीला खड्डे बुजवण्याचे काम देण्यात आले असून ते सुरू आहे. नोव्हेंबर अखेर पर्यंत महामार्गावरील सर्व खड्डे  बुजवण्याचे काम पूर्ण करण्याची हमी कंत्राटदारांनी दिली आहे.

त्याचप्रमाणे उर्वरित कामासाठी रु. २८२ कोटीची निविदा प्रक्रिया संपवून महामार्गाचे उर्वरित काम डिसेंबर मध्ये सुरू करून जून २०२३ अखेर पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. कायदेशीर बाबीत प्रकल्प अडकवून न ठेवता करारातील तरतुदीनुसार नवीन कंत्राटदारकडून काम पूर्ण करून खर्च पूर्वीच्या कंत्राटदारवर टाकण्यात येणार आहे.

त्याच प्रमाणे सोलापूर – औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील उस्मानाबाद शहर बायपास सर्विस रोड, उड्डाणपूल व त्यालगतच्या सर्विस रोड वरील पथदिवे याबाबत देखील पाठपुरावा सुरू असून लवकरच त्याबाबत सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे.


 
Top