तुळजापूर  / प्रतिनिधी-

मराठवाड्याच्या प्रवेशद्वारावरील तामलवाडी येथे गेल्या काही वर्षांपासून नवीन एमआयडीसी होणार...अशी चर्चा सुरू होती. यासाठी काही वेळा जागेची पाहणीही लातूर येथील एमआयडीसी कार्यालयाच्या अधिकार्‍यांकडून करण्यात आली होती मात्र शासनाकडून यासाठी हिरवा कंदील मिळत नव्हता. आता नवीन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत या एमआयडीसीबाबत माजी मंत्री तथा आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी एक बैठक घेतली आणि एकाच बैठकीत तामलवाडीच नाहीतर नळदुर्ग, शिराढोण, कळंब आदी भागातील नवीन एमआयडीसी मंजुरीबाबत सकारात्मक चर्चाही केली आणि लातूर औद्योगिक वसाहतीतील क्षेत्रीय कार्यालयाच्या संबंधित अधिकार्‍यांनी गेल्या 2 दिवसांपूर्वीच तामलवाडी येथील जागेची पाहणी केली असून, याचा प्रस्तावही ते लवकरच शासन दरबारी पाठविणार आहेत.

 या एमआयडीसीसाठी तामलवाडी येथे प्रारंभी 400 एकर औद्योगिक क्षेत्र विकसित होणार असून, यानंतर उद्योजकांच्या मागणीनुसार वाढीव क्षेत्र विकसित होणार आहे. या एमआयडीसीत 10,000 युवकांना नवीन रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, सोलापूर, पुणे आणि कर्नाटकातील अनेक उद्योजक याठिकाणी मोठी गुंतवणूक करणार असल्याची माहितीही आ. पाटील यांनी दिली. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या समवेत झालेल्या बैठकीमध्ये सोलापूर व इतर ठिकाणचे अनेक उद्योजक येथे येण्यासाठी उत्सुक आहेत, यावर सविस्तर चर्चा झाली. धाराशिव आकांक्षित जिल्हा असल्यामुळे येथे उद्योजकांना प्रोत्साहनपर गुंतवणुकीच्या 100% कर सवलत व बर्‍याच इतरही सुविधा मिळतात. राष्ट्रीय महामार्गासह येणार्‍या काळात होणार्‍या रेल्वे मार्गामुळे तामलवाडी येथे उद्योग व्यावसायांना मोठा वाव आहे. सुरूवातीला किमान 10 हजार रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेऊन पुढील आखणी केली जाणार आहे.

  रोजगार निर्मितीवर विशेष लक्ष केंद्रित- आ. राणा पाटील

धाराशिव जिल्ह्याचा विकास करताना आता आपण रोजगार निर्मितीवर विशेष लक्ष केंद्रित केले असून, उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तामलवाडी येथे नवीन औद्योगिक क्षेत्र उभारण्याचा निर्णय उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या समवेत झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. या अनुषंगाने एम.आय.डी.सी.चे क्षेत्रिय अधिकारी, लातूर यांच्यासह संबंधित अधिकार्‍यांनी तामलवाडी येथे येऊन जागेची पाहणी केली आहे.


 
Top