उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराष्ट्रातील कामगारांच्या हक्काचे प्रश्न सोडविण्याकडे चालढकल होत असल्यामुळे ते सोडवावेत यासाठी भारतीय मजदूर संघाच्यावतीने असंघटित कामगारामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सुरू असलेल्या मजदूर चेतना यात्रेचे उस्मानाबाद शहरात दि.१७ नोव्हेंबर रोजी आगमन झाले.

भारतीय मजदूर संघाच्यावतीने दि.६ ते १७ नोव्हेंबर दरम्यान राज्यातील २१ जिल्हे व १२५ तालुक्यातून या यात्रेच्या माध्यमातून राज्यातील ४९ लाख असंघटित कामगारांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.  ही यात्रा पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यांवरून सुरू झाली असून ती दोन टप्प्यांमध्ये कामगारांची जनजागृती करणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू करण्यात यावी, बांधकाम व घरेलू कामगारांसाठी ज्या योजना आहेत. त्याची अंमलबजावणी बंद आहे ती सुरु करण्यात यावी. तर किमान वेतन, बोनस, पगार वाढ, कामावरून कमी करणे याबाबत संघटना व कामगारांनी केलेल्या तक्रारीवर अनेक वर्षे निर्णय होत नाहीत. त्यामुळे त्यावर तात्काळ निर्णय घेऊन ती पूर्ववत सुरु करण्यात यावी. तसेच ओरिसा व हरियाणा राज्या प्रमाणे कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा निर्णय घ्यावा. विशेष म्हणजे अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात यावी यासह कामगारांच्या विविध समस्या व प्रश्न घेऊन कामगारांमध्ये जागरुकता करण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राज्यातील ४९ लाख कामगारांकडून कामगार राज्य विमा योजनेसाठी सर्वाधिक वर्गणी वजा हप्ता घेतला जाते. परंतू या योजनेची राज्यामध्ये व्यवस्थित व नीट अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे या गंभीर प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधून त्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी जागरुकता निर्माण करण्यात येत आहे.

त्यामुळे खास कामगारांची या यात्रेच्या माध्यमातून प्रत्यक्ष संपर्क साधाणे, सभा, बैठका व मेळावे घेण्यात येत आहेत. या यात्रेचा समारोप दि.२१ डिसेंबर रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर होणार असून त्यासाठी हजारो कामगारांच्या मोर्चा काढण्यात येणार आहे. या यात्रेत प्रदेशाध्यक्ष ऍड अनिल ठुमणे, प्रदेश महामंत्री मोहन येणुरे, प्रदेश संघटक मंत्री श्रीपाद बुटासकर, जिल्हाध्यक्ष प्रविण रत्नपारखी, जिल्हा सचिव निलेश भिरंगे, महाराष्ट्र राज्य वीज कामगार संघाचे एन.के. बळे, आनंद लिमकर, कंत्राटी महासंघाचे सुशीलकुमार उपळकर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top