उस्मानाबाद/ प्रतिनिधी - 

उस्मानाबाद जिल्हा केंद्रावर शनिवार दि.05 नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2022 ही परीक्षा सकाळी 11.00 ते दुपारी 12.00 या कालावधीत एकूण 09 उपकेंद्रावर घेण्यात येणार असून एकूण 2640 परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत.

उपकेंद्र क्र.01 श्रीपतराव भोसले हायस्कूल, पहिला मजला (240), उपकेंद्र क्र.02 श्रीपतराव भोसले हायस्कूल, दुसरा मजला (384), उपकेंद्र क्र.03 श्रीपतराव भोसले ज्यु.कॉलेज, तिसरा मजला (384), उपकेंद्र क्र.04 श्रीपतराव भोसले हायस्कूल,(आण्णा ई टेक्नो) नवीन इमारत (264), उपकेंद्र क्र.05 रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, पहिला व दुसरा मजला, तांबरी विभाग, पार्ट-B (240), उपकेंद्र क्र.06 रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, नवीन इमारत (240), उपकेंद्र क्र.07 छत्रपती शिवाजी हायस्कूल, तांबरी विभाग (384), उपकेंद्र क्र.08 जिल्हा परिषद कन्या प्रशाला, शहर पोलिस स्टेशनसमोर (264) आणि उपकेंद्र क्र.09 रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, तळ मजला, मेन रोड, तांबरी विभाग उस्मानाबाद पार्ट-A (240) असे एकूण 09 उपकेंद्रावर 2640 परीक्षार्थी ही परीक्षा देणार आहेत.

उमेदवारांनी परीक्षेस येताना प्रवेश पत्रासोबतच स्वत:चे आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, पॅनकार्ड, पासपोर्ट किंवा वाहन चालविण्याचा परवाना (फक्त स्मार्टकार्ड) यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र आणि त्याची एक झेरॉक्स प्रत सोबत आणावी आणि ती स्वत:च्या स्वाक्षरीसह समवेक्षकाकडे जमा करणे अनिवार्य आहे. उमेदवारांना परीक्षा कक्षात प्रवेश प्रमाणपत्र, काळा शाईचा पॉईंट पेन, मूळ ओळखपत्र व त्याची छायांकित एक प्रत इत्यादी साहित्य सोबत आणण्याची मुभा राहील. याव्यतिरिक्त इतर कोणतेही साहित्य उमेदवारांना सोबत बाळगता येणार नाही. उमेदवारांना एकदा परीक्षा उपकेंद्रावर प्रवेश दिल्यानंतर परीक्षा संपेपर्यंत परीक्षा केंद्राबाहेर जाता येणार नसल्यामुळे उमेदवारांनी पाणी बॉटल सोबत आणावी.

या परीक्षेसाठी जिल्ह्यातील 09 उपकेंद्र परिसरामध्ये दि.05 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 07.00 ते सायंकाळी 07.00 या कालावधीत कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील. त्याचप्रमाणे या उपकेंद्राच्या 100 मी. परिसरामधील झेरॉक्स सेंटर, पानपट्टी, टायपिंग सेंटर, एसटीडी बुथ, ध्वनीक्षेपक कॉम्प्युटर सेंटर्स, इंटरनेट कॅफे आदी माध्यमे बंद राहतील. तसेच उपकेंद्रावर परीक्षार्थी नियुक्त अधिकारी, कर्मचारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणासही (परीक्षार्थींचे नातेवाईक यांनाही) प्रवेश असणार नाही. या परीक्षा उपकेंद्र परिसरामध्ये मोबाईल फोन, सेल्युलर फोन, फॅक्स, ईमेल आणि इतर प्रसार मध्यमे घेऊन प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रवेश प्रमाणपत्र मिळण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या contact-secretary@mpsc.gov.in आणि support.online@mpsc.gov.in या ईमेल अथवा 1800-1234-275 किंवा 7303821822 या दूरध्वनी क्रमांकावरुन विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल, असे जिल्हा केंद्र प्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी कळविले आहे. 

 
Top