केंद्र व राज्य सरकारने गुळ पावडर कारखान्यांना उपपदार्थाची निर्मिती करण्यासाठी परवानगी द्यावी यासाठी प्रयत्न करणार - सुजितसिंह ठाकूर

उस्मानाबाद /प्रतिनिधी -

गुळ पावडर उत्पादक कारखान्यांना गुळ पावडर बरोबरच इथेनॉल यासारखे उपपदार्थ निर्मिती करणे गरजेचे आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने गुळ पावडर कारखान्यांना उपपदार्थाची निर्मिती करण्यासाठी परवानगी द्यावी यासाठी आपण केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली. 


तुळजापूर तालुक्यातील देवकुरुळी येथील श्री सिध्दीविनायक ॲग्रीटेक इंडस्ट्रीज या गुळ पावडर उत्पादक कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील तर मोहेकर ऍग्रोचे अध्यक्ष हनुमंत मडके, यशदा मल्टीस्टेटचे अध्यक्ष सुधीर सस्ते, तुळजापूर शुगरचे अध्यक्ष अनिल काळे, हातलाई शुगरचे अध्यक्ष अभिराम पाटील, रुपामाता ऍग्रोचे अजित गुंड, जि. प. चे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, तेरणा कारखान्याचे माजी अध्यक्ष सुरेश देशमुख, भाजपा जिल्हा सरचिटणीस ऍड. नितीन भोसले, विक्रम देशमुख, ओ. बी. सी. मोर्चा जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे, संतोष बोबडे, नागेश नाईक, सोलापूर येथील माजी नगरसेवक अनंत जाधव, नगरसेवक राजाभाऊ पवार, सतीश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. गव्हाणीत ऊसाची मोळी टाकल्यानंतर दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. 

यावेळी पुढे बोलताना माजी आमदार सुजितसिंह ठाकूर म्हणाले की, दत्ताभाऊ कुलकर्णी हे कल्पक नेतृत्व आहे. जो विचार ते करतात तो विचार कृतीत आणण्याची धमक त्यांच्यात आहे. त्यामुळेच श्री सिध्दीविनायक परिवाराची यशस्वी वाटचाल सुरु आहे. वास्तविक, गुळ पावडर कारखाना चालविने सोपी गोष्ट नाही, कारण राज्यातील अनेक कारखान्यांनी दुसरा गाळप हंगाम सुरु झाला तरी मागील हंगामातील ऊसाचे बिले दिली नाहीत. मात्र, श्री सिध्दीविनायक ॲग्रीटेकने चाचणी हंगामातील ऊसाचे बिल पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहे. त्यामुळे या कारखान्याचा पहिला गळीत हंगामही यशस्वी होणार असल्याचे सांगितले. तसेच श्री सिध्दीविनायकाच्या नावातच सिध्दी आहे, त्यामुळे या श्री सिध्दीविनायक परिवाराचे पुढील सर्व प्रकल्पही यशस्वी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

यावेळी मोहेकर ऍग्रोचे अध्यक्ष हनुमंत मडके, यशदा मल्टीस्टेटचे अध्यक्ष सुधीर सस्ते, माजी जि. प. अध्यक्ष नेताजी पाटील, तेरणा कारखान्याचे माजी अध्यक्ष सुरेश देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॅड.प्रतिक देवळे यांनी केले तर आभार संचालक गणेश कामटे यांनी मानले. कार्यक्रमास श्री सिध्दीविनायक अॅग्रीटेकचे सर्व अधिकारी, कर्मचारी, हितचिंतक, ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


 *१५ दिवसात ऊसाचे बिल अदा करणार - दत्ताभाऊ कुलकर्णी

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना श्री सिध्दीविनायक परिवाराचे अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी म्हणाले की, केवळ ९ महिन्यामध्ये श्री सिध्दीविनायक ॲग्रीटेक या कारखान्याची उभारणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी म्हणजेच १९ फेब्रुवारी २०२१ रोजी कारखान्याची उभारणीचा प्रारंभ करण्यात आला तर २५ डिसेंबरला कारखाना सुरु करण्यात आला. चाचणी गळीत हंगामात कारखाना १२२ दिवस चालला, त्यामध्ये ६२ हजार टन गाळप करण्यात आले. अपुऱ्या वाहन यंत्रणेनेमुळे गाळप करण्यास मर्यादा आल्या. मात्र, यावेळी हार्वेस्टरद्वारे तोडणी केलेला ऊसही कारखाना गाळप करणार आहे. कारखाना परिसरातील नागरीकांची सोय व्हावी यासाठी कारखाना स्थळावर एक रुग्णवाहिका व प्रथमोचार केंद्र सुरु करणार असून शेतकऱ्यांचे ऊसाचे उत्पन्न वाढावे यासाठी शेतकरी मित्र म्हणून ३ अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून ते अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले. यावेळीही मागील वर्षी प्रमाणे १५ दिवसात शेतकऱ्यांचे ऊसाचे बिल अदा करणार असल्याचे त्यांनी जाहिर केले.

 
Top