उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 निपुण भारत या मिशन अंतर्गत उस्मानाबाद जिल्हयातील 1927 अंगणवाडी सेविकांना दि.17 ते  19 ऑक्टोबर 2022 तीन दिवस आकार (बालशिक्षण) अभ्यासक्रम अंतर्गत प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. हे प्रशिक्षण जिल्हयातील 68 अंगणवाडी बीटस्तरावर देण्यात येत आहे. 

  या प्रशिक्षणाचे उद्घाटन आज दि.17 ऑक्टोबर 2022 रोजी  उस्मानाबाद तालुक्यातील उपळा येथील अंगणवाडी केंद्रात करण्यात आले. प्रशिक्षणाचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे आणि जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले.  प्रशिक्षणार्थी सेविका यांच्याशी चर्चा करुन त्यांना सखोल मार्गदर्शन केले. खाजगी अंगणवाडीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या अंगणवाडीमधील 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांच्या शैक्षणिक विकासाकडे लक्ष द्यावे. बालकांना मराठी - इंग्रजी संख्या ज्ञान, मराठी - इंग्रजी मुळाक्षरे वाचन-लेखन यावर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना दिल्या. तसेच बालकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करावे.  कृती केंद्रीत, उपक्रमाधिष्ठित आणि आनंददायी शिक्षण द्यावे असे सांगितले. तसेच आठवड्यातून एकदा प्रत्येक शिक्षकाने दोन तास अंगणवाडीमध्ये जाऊन अध्यापन करावे. उपळा अंगणवाडीतील परसबागेस श्री.ओम्बासे आणि श्री.गुप्ता यांनी भेट देऊन कौतुक केले. याप्रमाणे सर्व अंगणवाडीमध्ये परसबाग तयार करण्यात यावी असेही यावेळी सांगितले.

   प्रशिक्षणात शिक्षण विस्तार अधिकारी पारवे आणि पर्यवेक्षिका श्रीमती सोनवणे यांनी मास्टर ट्रेनर म्हणून काम केले. या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाक) बी.एच.निपाणीकर, तेरचे बाल विकास प्रकल्पाधिकारी जे.जी.राठोड, विस्तार अधिकारी (शि)  देवगुडे भारत, उपळा जि.परिषद प्रशालाचे मुख्याधापक नागेश कदम आदी उपस्थित होते.


 
Top