उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्ह्याच्या पर्यटन स्थळांमध्ये  जागतिक ओळख असलेल्या तेर येथील बौद्ध वास्तूचाच जिल्हा प्रशासनाला विसर पडला असून जाणीवपूर्वक खोडसाळपणे असा प्रकार करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे यांनी केली आहे.

  जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राची ओळख‌ जागतिक पातळीवर व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने मुख्य प्रवेशावर उभारलेल्या भितीपत्रकावर बौद्ध वास्तूचाच जातीयवादी द्वेषातून, जाणून बुजून व खोडसाळपणाने उल्लेख न केल्याने प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचे गैरकृत्य समोर आले आहे. त्यामुळे बौद्ध स्थळांचा इतिहास दडवला गेला आहे. हे गैरकृत्य करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी.

 जिल्ह्यातील पर्यटन स्थळाची ओळख व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराच्या दक्षिण (डाव्या) बाजूस भितिपत्रकावर संपूर्ण जिल्ह्यातील पर्यटन स्थळाचा नकाशा रेखाटण्यात आलेला आहे. या भितीपत्रकावर उस्मानाबाद जिल्हा असे शीर्षक देऊन त्यामध्ये श्री तुळजाभवानी देवी, उस्मानाबादी शेळी, कृषीमध्ये ज्वारीचे पठार, संत गोरोबाकाका मंदिर, मल्लखांबाची प्रात्यक्षिक, हॉलीबॉलचे छायाचित्र, जिल्हा परिषदेची इमारत, भगवान महावीर, खॉजा शमशोद्दीन गाजी रहे., नळदुर्ग व परंडा येथील ऐतिहासिक किल्ला आदी स्थळांचा समावेश करण्यात आलेला आहे. मात्र जागतिक पातळीवर संपूर्ण देशाची ओळख असलेला व शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्धाचे तेर येथील कै. रामलिंगअप्पा लामतुरे पुरातन वस्तू संग्रहालय याचा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने केवळ जातीय द्वेषातून यामध्ये समावेश केलेला नाही. जिल्ह्याचा खरा इतिहास घडवण्याचा हा संबंधित अधिकाऱ्याने जाणीवपूर्वक केलेला प्रकार दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या त्या अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी. तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन संबंधितावर प्रशासकीय कारवाई होण्याची गरज आहे. यासंदर्भात आपल्या स्तरावरून जबाबदारी निश्चित करून दोशींवर कठोर कारवाई न झाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे,  सागर चव्हाण, सत्यजित माने, सुगत सोनवणे, ताहेर शेख यांची स्वाक्षरी आहे.


 
Top