उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद जिल्हा कोषागाराअंतर्गत निवृत्तीवेतन घेणारे सर्व निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतन धारकांची अद्याक्षरनिहाय यादी कोषागार कार्यालयाकडून बँकेत पाठविण्यात येणार आहे. निवृत्ती वेतन चालू ठेवण्याकरिता दि.01 नोव्हेंबर ते 09 डिसेंबर 2022 या कालावधीत निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी प्रत्यक्ष बँकेत हजर राहून यादीतील त्यांच्या नावासमोर स्वाक्षरीच्या रकान्यात शाखा व्यवस्थापकासमोर स्वाक्षरी करावी किंवा अंगठ्याचा ठसा उमटवावा. यावर्षीच्या यादीत आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल नंबर, पुनर्विवाह तसेच पुनर्नियुक्तीबाबत माहिती लागू असल्यास ती देखील नोंदवावी.

  या पध्दतीशिवाय बायोमॅट्रीक पध्दतीने जीवनप्रमाण दाखला www.jeevanpraman.gov.in  या संकेत स्थळावर दि.01 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2022 या कालावधीत सादर करावे. तसेच हयातीचे दाखले प्रत्यक्ष निवृत्तीवेतन धारकाकडून हस्तवटवड्याने, टपालामार्फत सादर करता येतील.

 यादीत ज्यांनी स्वाक्षरी अथवा अंगठा उमटविलेला नसेल अथवा ऑनलाईन जीवनप्रमाण दाखला सादर केलेला नसेल तसेच प्रत्यक्षरित्या अथवा टपालाद्वारे कोषागारामध्ये सादर केलेला नसेल त्यांचे माहे डिसेंबर 2022 चे निवृत्तीवेतन अदा केले जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी सचिन इगे यांनी केले आहे.


 
Top