उस्मानाबाद  /प्रतिनिधी-  

लेडीज क्लब आयोजित नवरात्र दांडीया महोत्सवास शनिवारी (दि.१) सायंकाळी उस्मानाबादकरांच्या  उत्स्फूर्त प्रतिसादाने प्रारंभ झाला. मराठी सिनेअभिनेत्री मानसी नाईक हिच्या अदाकारीवर उपस्थित प्रचंड गर्दीने दाद दिली. नवरात्रत दांडीया महोत्सव एक, दोन, तीन  ऑक्टोबर चालणार आहे.

 शहरातील या महोत्सवात  अनेक मंडळींनीही दांडीयामध्ये सहभाग घेतला. लेडीज क्लबच्या प्रांगणात सुरू झालेल्या या दांडीया महोत्सवात आणखी दोन दिवस विविध मराठी कलाकार उपस्थित राहणार आहेत. 

उस्मानाबाद शहर हे मध्यवर्गीयाचे शहर असल्याने व म्हणावे तसे करमणुकीचे साधन शहरात नसल्याने या दांडीया महोत्सवास लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. गेले ३ वर्षे कोरोनामुळे लेडीज क्लब आयोजित महोत्सव होऊ शकला नाही. मात्र यावर्षी महोत्सव घेण्याचा  मनोदय क्लबच्या अध्यक्ष अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला  त्यामुळे उस्मानाबादकरांना सांस्कृतीक मेजवानी मिळाली. मानसी नाईकने आपल्या अनोख्या स्टाईलमध्ये राम राम ठोकताच टाळ्या व शिट्ट्यांचा कडकडाट झाला. ‘मैफिलीला घ्या माझा मुजरा’ या गाण्याने सुरुवात करून युवक युवतींना आपल्या तालावर थिरकायला भाग पाडले. 

यावेळी आ. राणाजगजितसिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, लेडीज क्लब अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. युवक युवतींना दांडिया खेळण्यासाठी लेडीज क्लबच्या वतीने व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. महोत्सवामध्ये सहभागी मंडळे व सहभागी जोडप्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच रविवारी व सोमवारीही महाराष्ट्रातील प्रसिद्ध अभिनेत्री समृध्दी केळकर, रूपाली भोसले, प्राजक्ता गायकवाड व सोनाली कुलकर्णी  येणार आहेत.  

 
Top