उस्मानाबाद /  प्रतिनिधी- 

उस्मानाबाद शहरासह तालुक्यातील बेंबळी, ढोकी, शिंगोली, पाडोळी (आ.), केशेगावसह तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी, काटगाव आदी गावांसह सर्वच तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने मोठा धुमाकूळ घातला आहे. उस्मानाबाद शहरात अवघ्या दोन तपास तब्बल ५८ मिमी पावसाची नोंद झाली.ढग फुटी सदृश्य  पाऊस व विजांच्या कडकडाटामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले होते. िजल्हयाची पावसाची वार्षीक सरासरी ७६८ मीमी आहे. परंतू यंदा ११०० मीमीच्या पुढे पाऊस झाला आहे. सर्वच शिवारात सध्या पाणीच पाणी दिसत आहे.   यामुळे जिल्ह्यात आता ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती आहे.

यावर्षी आतापर्यंत शहरातून वाहणाऱ्या 2 नद्यांना विशेष पाणी दिसून आले नव्हते.’ मात्र, शुक्रवारच्या पावसाने नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. शहरातून जाणारी मुख्य भोगावती नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. तसेच सांजा रोडवर असलेल्या ओढ्यातही पाणी दिसत होते. या हंगामात प्रथमच नदीला अधिक पाणी दिसून आले.शहराला शुक्रवारी दुपारी २ पासून सुमारे दोन तास पावसाने झोडपले. या दरम्यान तब्बल ५८ मिमी पावसाची नोंद झाली. बसस्थानक, सांजा रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा रस्ता आदी ठिकाणी गुडघाभर पाणी साचले होते. यामुळे मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याने वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांची दमछाक झाली.

पावसाचा वेग प्रचंड असल्यामुळे वाहन चालवताना समोरील काहीही दिसत नव्हते. धारांच्या दणक्यामुळे ऑटोरिक्षा, दुचाकी, लहान कार चालवणेही अशक्य झाले होते. सुरुवातीला केवळ २१ मिनिटे पाऊस झाला. ८ मिनिटांच्या विश्रांतीनंतर पुन्हा दीड तास दुपारी चार वाजेपर्यंत कोसळला. सर्वच भागात पाऊस झाल्यामुळे रस्त्यावर पाण्याचे प्रचंड लोट येत होते. छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात पाणी वाहत होते. नागरिकांना पाण्याच्या प्रवाहासोबत जाता येत नव्हते. दुचाकी चालकांचाही तोल जात असल्याने त्यांनाही दुचाकी हाताने ओढत न्यावी लागत होती. यामुळे अनेक वाहनचालक जागेवरच थांबले. पाऊस थांबल्यावर सर्वांनीच जागा सोडण्याचा प्रयत्न केला. यामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीसारखे दृश्य दिसून  आले. बसस्थानक परिसरात तुळजापूर रस्त्यावर वाहतूक तब्बल पाऊणतास खोळंबली होती. दुचाकीलाही जाता येत नव्हते. अखेर पोलिस प व काही वाहनचालकांनी प्रयत्न करून वाहतूक अ सुरळीत केली.

 
Top