- तुळजाभवानी मंदिरासह परिसर विकासाला चालना मिळणार

 उस्मानाबाद /प्रतिनिधी - खरीप 2020 चा पीकविमा, उच्च न्यायालयात पीकविमा कंपनीविरोधातील न्यायालयीन लढा आणि सर्वोच्च न्यायालयाचा आदेश याचा अर्थ आपल्यावर आरोप करणार्‍यांना लावता येत नाही. त्यामुळे त्यांची बुध्दी, संस्कार त्यांना लखलाभ असो, अशा शब्दात भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकरांचे नाव न घेता प्रत्युत्तर दिले.

शहरातील प्रतिष्ठान भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी विविध विषयांवर माहिती दिली. राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या खात्यावर 50 हजार रूपयांचे अनुदान जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी ज्या शेतकर्‍यांचे नाव यादीमध्ये आहे, अशा सर्व शेतकर्‍यांनी आपले बँक खाते पॅनकार्ड आणि आधारकार्डशी संलग्नित करून घेण्याची कार्यवाही तत्काळ करावी. जेणेकरून निधी प्राप्त होताच शेतकर्‍यांना दिवाळीपर्यंत प्रोत्साहनपर 50 हजारांचे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करणे सोयीस्कर होईल. राज्यात शेतकर्‍यांच्या हक्काचे सरकार आले आहे. त्यामुळे पीकविमा, अनुदान, खरीप हंगामातील नुकसान भरपाई व अनुदान स्वरूपात जिल्ह्याला दिवाळीपर्यंत बाराशे कोटीवर निधी मिळणार आहे. हा सर्व निधी शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होणार आहे.

दरम्यान तुळजापूर विकास प्राधिकरण व मंदिर संस्थानची शनिवारी बैठक पार पडली. या बैठकीत तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य गाभार्‍यात चांदीच्या पत्र्याने सजविणे, तुळजाभवानी देवीचा वेगळा असा चांगल्या दर्जाचा प्रसाद भाविकांना मंदिरातच उपलब्ध करून देणे यासह भाविकांच्या सोयीसाठी मंदिर, शहर व परिसराचा विकास आराखडा तयार करून केंद्र सरकारच्या प्रशाद योजनेतून विकासात्मक कामे करण्याबाबत निविदा भरण्यात येणार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

 
Top