कळंब / प्रतिनिधी-

 व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी अगोदर आपले ध्येय निश्चित करून त्या दृष्टीने वाटचाल करताना मोठ्या माणसांशी आदराने वागणे,आत्मविश्वास,एकमेकांशी संभाषण,आपलं दिसणं,चांगले वागणे,भाषाशैली,वैचारिक पातळी,बुद्धी सामर्थ्याने कुठल्याही स्तरांवर विजय प्राप्त केला पाहिजे.असे प्रतिपादन कृषी विषयक सखोल माहिती असलेले अभ्यासक व विविध लेखांद्वारे तळागाळातील वस्तुस्थिती शासनाच्या सामोरे आणणारे लेखक बालाजी आडसूळ यांनी केले.

   श्री निसर्ग मंडळ संचलित  शहरातील  भैरवनाथ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था व भैरवनाथ अध्यापक विद्यालय येथे व्यक्तिमत्त्व विकास अंतर्गत शहरातील सामाजिक,शैक्षणिक,औद्योगिक  क्षेत्रातील यशस्वी मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम प्राचार्य सुरज भांडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

यावेळी कृषीविषयक अभ्यासक  बालाजी आडसूळ,साने गुरुजी कथामालेचे तालुकाध्यक्ष सोपान पवार,देवगिरी शेती आवजारे इंडस्ट्रीजचे बालाजी मडके यांच्या प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस सरस्वती  व  भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार मान्यवरांच्या हस्ते अर्पण करण्यात आले.

पुढे बोलताना बालाजी आडसुळ म्हणाले की, तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी संस्काराचे महत्त्व अधोरेखित करून आपला शारीरिक,भावनिक,बौद्धिक, सामाजिक विकास झाला असेल तर आपले व्यक्तिमत्त्व अधिक खुलून दिसते.आरोग्याकडेही आवर्जून लक्ष दिले पाहिजे.आपली उत्तम शरीरयष्टी राखून चंचलता,स्वच्छता,बोलणे,चालणे,दिसणे यातून व्यक्तिमत्वाचा विकास होतो.

याप्रसंगी साने गुरुजी कथामालेचे तालुकाध्यक्ष सोपान पवार म्हणाले की,आतरंग व बाह्यरंगानेच व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो.  विद्यार्थ्यांनी नवीन छंद जोपासण्यासाठी अनेक विविध ग्रंथाचे वाचन,श्रोते, कलाकार,इतरांचा सन्मान करावा.तर देवगिरी शेती आवजारे इंडस्ट्रीजचे बालाजी मडके यांनी

अभिव्यक्ती विकासावर बोलताना सांगितले की,आजच्या जगात व्यक्त होण्याची माध्यमे ही बदलली असून सोशल मीडिया वरील फेसबुकवर व्यक्त होताना एखादया माहितीचे ही खूप मोठया प्रमाणत लिखाण करता येते पण ती माहिती साध्या दोन शब्दांत सांगता येत नाही. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निदेशक अविनाश म्हेत्रे तर सूत्रसंचालन प्रा.श्रीकांत पवार यांनी केले तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके यांनी केले.

 
Top