उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराष्ट्र शासनाने दिवाळीनिमित्त रेशन कार्डधारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्याची घोषणा केलेली असली तरी अद्याप एकाही लाभार्थ्याला शिधा मिळालेला नाही. त्यामुळे दोन दिवसात शिधा वाटप करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ.मनीषा शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वात आज (दि.21) निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, दिवाळीनिमित्त महाराष्ट्र शासनाने रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाचा शिधा या उपक्रमाची घोषणा केली होती. दिवाळीपूर्वी सदरील शिधा रेशनकार्ड धारकाला मिळणे अपेक्षित होते. मात्र आजपासून दिवाळी सुरू झाली आहे, तरीही एकाही रेशनकार्डधारकाला अद्याप आनंदाचा शिधा मिळालेला नाही. रेशन दुकानदाराला विचारणा केली असता मोदी साहेब, मुख्यमंत्री साहेब व उपमुख्यमंत्री साहेबांचे फोटो अजून आलेले नाहीत. त्यामुळे शिधा वाटप करता येत नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने गुत्तेदारांसाठीच ही योजना केली आहे काय? असा सवाल राष्ट्रवादी महिला काँग्रेसने केला आहे.  येत्या दोन दिवसात रेशन कार्डधारकांना शिधा पोहचविण्याची व्यवस्था करावी. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये गेल्या आठवडाभरात तीन शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखाची मदत द्यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांचीही भेट घेऊन आनंदाचा शिधा लवकरात लवकर रेशनकार्ड धारकांना मिळावा याची व्यवस्था करण्याची मागणी केली. 

निवेदनावर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ.मनीषा पाटील, तालुका कार्याध्यक्ष अ‍ॅड.कल्पना निपाणीकर, कार्यकारिणी सदस्य मंजुषा खळदकर, अनिता गरड, अश्विनी शिनगारे, अल्पसंख्यांक विभाग तालुकध्यक्ष सलमा सौदागर, तालुका उपाध्यक्ष सुनीता जगदाळे, शहराध्यक्ष रविना बिराजदार,  सुरेखा जगदाळे, सुलभा जगदाळे यांची स्वाक्षरी आहे.

 
Top