उस्मानाबाद / प्रतिनिधी-

सततच्या पावसाने शेतपिकांचे अतोनात नुकसान केले आहे. यापूर्वी साठ कोटी रूपयांची मदत वितरीत करण्यात आली आहे. आताही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत उपलब्ध करून देण्यासाठी जवळपास दिडशे कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, याची दक्षता घेतली जाणार असल्याचे पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी आज येथे सांगितले. उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करताना शेतकऱ्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते.

 पालकमंत्री डॉ. सावंत यांनी प्रारंभी परांडा तालुक्यातील खानापूर पाटी शिवारात रमेश उध्दव कुदळे यांच्या शेतातील नुकसानाची पाहणी केली. तसेच कुंभेजा शिवारातील किरण कोकाटे आणि बालजी कोकाटे यांच्या शेतातील पिकांची पाहणी केली. पालकमंत्री डॉ. सावंत म्हणाले, खरिपाच्या पेरणीनंतर शेतकऱ्यांना साठ कोटी रुपयांची मदत वितरीत करण्यात आली आहे. आता परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी सुमारे दिडशे कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनास पाठविला जाणार आहे.

 कळंब येथील कचरू श्रीपती अंबीरकर आणि विजयप्रसाद त्रिवेदी यांच्याही शेतातील पीक नुकसानीची पालकमंत्री डॉ. सावंत यांनी पाहणी केली. इंदापूर गावातील राजेंद्र गीरी या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पालकमंत्री डॉ. सावंत यांनी पीक नुकसानीची पाहणी केली. तसेच परांडा, वाशी आणि कळंब या तालुक्यात शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांनी नुकसानीची पाहणी केली. यावेळी उपविभागीय आधिकारी अहिल्या गाठाळ, तहसिलदार रेणुकादास देवणीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी एम. रमेश, तहसीलदार उषाकिरण शृंगारे, नरसिंग जाधव, मुस्तफा खोंदे, तालुका कृषी अधिकारी श्री. रूपनवर, बी. बी जाधव यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

 ऑगस्ट आणि सप्टेंबर-ऑक्टोबर अशा दोन टप्प्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. काही महसूल मंडळात झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्यात आली असून दुसऱ्या टप्प्यातील अतिवृष्टीमध्ये भूम –परांडा आणि वाशी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे पिके खराब होत असल्याने या नुकसानीचीही भरपाई देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला असल्याचे पालकमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत आत्तापर्यंत झालेल्या पिकांच्या नुकसानीचा समावेश करून शेतकऱ्यांना वाढीव मदत देण्यात येईल,  असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले.

 आत्महत्याग्रस्त शेतकरी दाम्पत्यांच्या मुलांना घेतले दत्तक

 वाशी तालुक्यातील दशमे गावातील बाबुराव रघुनाथ उघडे, सौ. सारिका बाबुराव उघडे या शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केली असून त्यांच्या कुटुंबियांची पालकमंत्री डॉ. सावंत यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच उघडे दाम्पत्याचा मुलगा रुपेश आणि मुलगी दिव्या यांच्याकडे संवेदना व्यक्त केल्या. यावेळी या दोन्ही मुलांना आपण दत्तक घेत असल्याचे सांगून त्यांच्या शिक्षणापासून विवाहपर्यंतची जबाबदारी पालकमंत्री डॉ. सावंत यांनी घेतली. तसेच या कुटुंबियांना पाच लाखाची तत्काळ मदत जाहीर केली. घाटनांदूर येथील शेतकरी सय्यद जावेद करिम यांच्या आईच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांचेही पालकमंत्र्यांनी सांत्वन केले. तसेच त्यांना दोन लाख रूपयांची मदत दिली.

 गावांतर्गत रस्त्यासाठी 35 कोटी रूपये मंजूर

 पालकमंत्री डॉ. सावंत यांनी गोजवाडा येथील नदीवरील पुलाची पाहणी केली. या गावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात ग्रामस्थांशी चर्चा करताना त्यांनी गावांतर्गत रस्त्यांकरिता पस्तीस कोटी रूपयांचा निधी जिल्ह्यासाठी मंजूर केला असल्याचे ग्रामस्थांना सांगितले.

 
Top