तुळजापूर / प्रतिनिधी-

 आश्विनी पौर्णिमेनिमित्त तुळजापुरात रविवारी कोजागिरी व  सोमवार  दि.१० रोजी अाश्विनी पोर्णिमानिमित्ताने  देवीचरणी वारी आर्पण करण्यासाठी   भाविकांची मोठी गर्दी  झाली  होती .

कोजागिरी पोर्णिमा व मंदीर पोर्णिमा या दोन पोर्णिमा दिवसाचा कालावधीत  तब्बल पाच  लाखांपेक्षा जास्त भाविकांनी पायी चालत येऊन ‘ आई राजा उदे -उदे’चा गजर करीत तुळजाभवानीचे दर्शन घेतले . 

अाश्विनी पौर्णिमेदिनी श्रीतुळजाभवानी मंदीरात आकर्षक फुलांची आरास केली होती. राजेशहाजी महाद्वारासमोर  फुलापासून शंभुमहादेवाची मुर्ती     भाविकांचे लक्ष वेधुन घेत होती.

 सोमवारी पहाटे १.३० वा. देवीची मुख्य मूर्ती  सिहासनावर  प्रतिष्ठापित करण्यात आली.  त्यानंतर भाविकांच्या अभिषेक , पूजेस व धर्म दर्शनास प्रारंभ झाला. नित्योपचार पूजा झाल्यानंतर देवीस उंची वस्त्रे नेसवून सुवर्णालंकारांनी सजविण्यात आले.

 सांयकाळी पुनश्च भाविकांचे देविजीस दही-दुध-पंचामृत अभिषेक  पूजा करण्यात आली . नंतर नित्योपचार पूजा घाण्यात येऊन सोलापूरच्या शिवलाड समाजाचे बाशिंग व नागफणींनी शोभिवंत केलेले विजयध्वज आणि त्या वर्षाचा मानाचा छबिना पुढे घेऊन या वर्षाचा सर्वात प्रमुख व मोठा छबिना विविध धार्मिक वाद्यांच्या गजरात पद्य कवन म्हणत हजारो भक्तांच्या सहभागाने काढण्यात आला . यावेळी भक्तांनी या छबिन्यावर गुलाबपुष्प व हळद - कुंकवाची उधळण केली . या सोहळ्याने पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाचा समारोप झाला . 

 रविवार पहाटे चार वाजल्यापासुन  पायी चालत येणाऱ्या भाविकांनी तुळजापूर नगरीत गर्दी केली होती . तुळजापुरातील रस्ते भाविकांनी गजबजून गेले होते . प्रचंड गर्दीमुळे काहींनी गोमुख व कल्लोळाच्या तीर्थात स्नान करून काहींनी कळस , तर काहींनी मुखदर्शन , तर काहींनी धर्म दर्शन घेतले . पायी चालत येणाऱ्या भाविकांसाठी  मोफत अन्नदानाची सोय केली होती . तसेच अनेक ज्ञात - अज्ञात भाविक आणि सेवाभावी संस्थांनी विविध मार्गावर चहापासून ते स्नान , भोजनाची तसेच स्नानासाठी गरम पाण्याची सोय केली होती . सोलापूरहून 3 लाख , नळदुर्गहून १ लाख , लातूरहून १ लाख , बार्शीहून १ लाख व उस्मानाबादवरून २५ हजार भाविक दर्शनासाठी आले होते . भाविकांच्या या विक्रमी गर्दीमुळे परिवहन मंडळाने केलेले परतीसाठीचे नियोजन पार कोलमडले . भाविकांना अक्षरशः टपावरून प्रवास करून घर गाठावे लागले . यंदा प्रथमच पोलीस , भाविक , पुजारी व शहरवासीयांतील समन्वयामुळे यात्रा निर्विघ्न  व सुरळीत पार पडली.

रात्री मंदीर प्रागणांत छबिना काढण्यात आल्यानंतर देविचे मुख्य महंत  वाकोजीबुवा, गुरु तुकोजीबुवा  यांनी प्रक्षाळपुजा  केल्यानंतर मंदीर प्राँंगणात उपरण्यात जोगवा मागितल्यानंतर नवराञोत्सवाचा व अाश्विनी पौर्णिमेच्या विधीची सांगता झाली. 


 
Top