उस्मानाबाद/प्रतिनिधी-

  सर्वोच्च न्यायालयाने सांगूनही पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना विम्याची रक्कम दिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळी सण साजरा करता आला नाही. तरीही शेतकरी अजून संयम बाळगून आहेत. पीकविमा खरीप हंगाम 2020 हा शेतकऱ्यांच्या हक्काचा विमा असून तो मिळण्यासाठी मागील 5 दिवसांपासून आमदार कैलास पाटील यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु असून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करत आहेत. याचा निर्ढावलेल्या प्रशासनावर परिणाम होवून पीकविमा खरीप हंगाम 2020 च्या पात्र लाभार्थ्यांच्या याद्या प्रशासनाने तयार केल्या आहेत. 

धाराशिव तालुक्यातील 75 हजार 28 शेतकऱ्यांना 73 हजार 800 हेक्टर क्षेत्रासाठी 133 कोटी, तुळजापूर तालुक्यातील 65 हजार 92 शेतकऱ्यांना 70 हजार 335 हेक्टर क्षेत्रासाठी 126.60 कोटी, उमरगा तालुक्यातील 36 हजार 132 शेतकऱ्यांना 32 हजार 372.77 हेक्टर क्षेत्रासाठी 58.27 कोटी, लोहारा तालुक्यातील 24 हजार 949 शेतकऱ्यांना 23 हजार 862.24 हेक्टर क्षेत्रासाठी 42.95 कोटी, भूम तालुक्यातील 37 हजार 85 शेतकऱ्यांना 29 हजार 276.65 हेक्टर क्षेत्रासाठी 34.70 कोटी, परांडा तालुक्यातील 3 हजार 163 शेतकऱ्यांसाठी 2 हजार 12.17 हेक्टर क्षेत्रासाठी 3.62 कोटी, कळंब तालुक्यातील 89 हजार 994 शेतकऱ्यांना 63 हजार 131.57 हेक्टर क्षेत्रासाठी 113.64 कोटी तसेच वाशी तालुक्यातील 32 हजार 66 शेतकऱ्यांना 19 हजार 871.75 हेक्टर क्षेत्रासाठी 35.77 कोटी अशा एकुण 3 लाख 53 हजार 499 शेतकऱ्यांना 3 लाख 04 हजार 751.38 हेक्टर क्षेत्रासाठी 548.55 कोटी रुपये निधीच्या सुधारित याद्या प्रशासनाने तयार केल्या असून ग्रामपंचायतींना या याद्या लावण्याच्या संदर्भात आदेशित केले आहे.

 
Top