उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कळंब चे सहायक पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या आदेशावरुन कळंब उप विभागाचे पथक अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कारवाई करण्यासाठी  कळंब शहरात गस्तीस होते. गस्ती दरम्यान पथकास गोपनीय माहिती मिळाली की, कळंब येथील- रंजीत नागनाथ आघाडे हे छत्रपती संभाजी मार्केट, कळंब येथील गाळ क्र. 21 मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा बाळगलेले आहेत. यावर पथकाने नमूद ठिकाणी छापा टाकला असता तेथे रंजीत आघाडे यांसह त्यांचा साथीदार- साहेब खलील शेख हे दोघे नमूद गाळ्यात व गाळ्यासमोर उभ्या असलेल्या आघाडे यांच्या मालकीच्या डस्टर वाहन क्र. एम.एच. 01 सीक्यु 2622 मध्ये तसेच शेजारील गाळा क्र. 25 मध्ये 584 पुडके व एक खोके विविध कंपनीचा गुटखा व तंबाखु जन्य पदार्थ असा एकुण 1,12,667 ₹ किंमतीचा महाराष्ट्र शासन प्रतिबंधित अन्न पदार्थ बाळगलेले आढळले. पथकाने त्या दोघांकडे अधिक तपास केला असता रंजीत आघाडे यांनी त्यांच्या घरासमोरील गुदामातही गुटखा बाळगला असल्याचे समजले. यावर पथकाने आघाडे यांच्या घरासमोरील गुदामात छापा टाकला असता तेथे 1,325 ₹ किंमतीचा 33 पुडके गुटखा आढळला. पथकाने नमूद सर्व ठिकाणचा गुटखा, एक स्मार्टफोन व डस्टर वाहन असा एकुण 8,48,392 ₹ किंमतीचा माल जप्त केला आहे.

 तरी रंजीत आगाडे व सोहेब शेख या दोघांनी संगनमत करुन महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा व तंबाखु जन्य पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक करुन मानवी शरीरास अपायकारक असल्याचे माहित असतानाही जवळ बाळगलेले मिळुन आल्याने पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द कळंब पो.ठा. येथे गुन्हा क्र. 347/2022 हा भा.दं.सं. कलम- 328, 272, 273, 34 अंतर्गत  गुन्हा नोंदवला आहे.

  सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन सहायक पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि- श्री. मालुसरे, श्री. पुजारवाड, पोलीस अंमलदार- अंभोरे, खांडेकर, साळुंके, कांबळे, शेख यांच्या पथकाने केली आहे.

 
Top