उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे सक्रिय सहभागी होते. त्यामुळे त्यांना कारावास आणि शिक्षाही झाली होती. भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी रा.स्व. संघ शाखांवर स्वयंसेवकांना कटीबद्ध होण्याचं आवाहन करण्यात येत होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ. रमेश पांडव यांनी केले. ते धाराशिव येथे रूपामाता उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री गणेशोत्सव व्याख्यान मालेत भारतीय स्वातंत्र्य लढ्यात रा.स्व. संघाचे योगदान या विषयावर उद्घाटनपर पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, विधी प्रकोष्ठ राज्य संयोजक अ‍ॅड. मिलींद पाटील, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड. व्यंकटराव गुंड, सु.रा. पाटील, माजी नगरसेवक रमण धोत्रीकर, विजयकुमार पिसे, ज देविदास पाठक यांसह आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रा.डॉ. रमेश पांडव पुढे म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे बालपणापासून सक्रिय होते. त्यांनी संघ स्थानपनेपूर्वीपासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या असहकार आंदोलनासह अनेक आंदोलनात आणि कार्यक्रम, उपक्रमात सहभागी होते. त्यामुळे त्यांना अटक झाली होती, शिक्षाही झाली होती. 1925 ला रा.स्व. संघाची स्थापना होण्यापूर्वी कांही दिवस अगोदर डॉ. हेडगेवारांनी काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या धोरणापासून फारकत घेवून स्वातंत्र्य प्राप्तीसाठी प्रखर राष्ट्रप्रेमी संघटन उभे करण्याचा चंग बांधला होता. भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वी त्याग करून स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन संघाच्या शाखांवर करण्यात येत होते. त्यामुळे अनेक संघ प्रचारक भारतच्या वेगवेगळ्या भागात जावून राष्ट्रभक्तीचा यज्ञ पेटवत होते. त्यात घराबाहेर पडून सर्व सुखांचा त्यागकरून प्रचारक म्हणून जावून आयुष्याच्या समीधा अर्पण करत होते. स्वातंत्र्य प्राप्तीच्या ध्येयासाठी झटणार्‍या संघ स्वयंसेवकांचे महात्मा गांधी, मोतीलाल नेहरूंनीही कौतुक केले होते. हे रा.स्व. संघाचे स्वातंत्र्य लढ्यातले योगदान जाणिवपूर्वक टाळणारी कम्युनिस्ट विचार धारा हेच देशापुढील मोठे संकट असल्याची टिकाही डॉ. पांडव यांनी यावेळी केली. या व्याख्यानमालेच्या उपक्रमाला शुभेच्छा देताना नितीन काळे यांनी दै. तरूण भारतच्या उपक्रमांचे कौतुक केले. रा.स्व. संघाचे विचार जनतेपर्यंत पोहोंचवण्याचे काम या व्यासपीठावरून होत असल्यामुळे वैचारिक प्रबोधन होणार आहे. यासाठी त्यांनी  धन्यवाद दिले. तर रूपामाता उद्योग समूहाचे संस्थापक आणि भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड. व्यंकट गुंड यांनी ही या व्याख्यानमालेच्या आयोजनाबद्दल  कौतुक केले. आणि भविष्यातही अशा उपक्रमांना सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.

या कार्यक्रमात उस्मानाबाद  शहरातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक सु.रा. पाटील आणि माजी नगरसेवक रमण धोत्रीकर यांचा   सन्मानपत्र, शाल, बुके देवून कार्यगौरव विशेष सत्कार करण्यात आला. सु.रा. पाटील यांनी रा.स्व. संघ, पतंजली योग शिक्षक तसेच माध्यमिक शिक्षक म्हणून केलेल्या समाज सेवेच्या कार्याबद्दल सन्मानपत्राद्वारे उल्लेख करून त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच रमण धोत्रीकर यांनी रा.स्व. संघ विचारांच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेतून केलेले छात्र नेतृत्व, त्यानंतर एकत्रीत धाराशिव-लातूर जिल्ह्यातील तरूणांचे भाजयुमोच्या माध्यमातून केलेले भाजयुमो जिल्हाध्यक्ष म्हणून केलेले राजकिय नेतृत्व, त्यानंतर जनसंघाचे धाराशिव शहरातील पहिले नगरसेवक, त्यांनतर भाजपाचे स्विकृत नगरसेवक या कार्यकाळापासून ते करत असलेले जनसेवा आणि लोक सेवेबद्दल उल्लेख करून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांना सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला.

या व्याख्यान माला उद्घाटनाचे प्रास्ताविक दै. तरूण भारतचे जिल्हा प्रतिनिधी देविदास पाठक यांनी केले. त्यात त्यांनी ही गणेशोत्सव व्याख्यान माला सुरू करण्यामागची भूमिका आणि विशेष कार्यगौरव सत्कार कार्यक्रमाचे महत्व सांगितले. या उद्घाटनपर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्ज्वला मसलेकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार देविदास पाठक यांनी मानले.


 
Top